On the spot FIR now in Buldana : पोलीस अधिक्षकांच्या कल्पनेतून योजनेची अंमलबजावणी
Buldhana सामान्य नागरिकांना जलद व प्रभावी न्याय मिळावा या उद्देशाने बुलडाणा जिल्हा पोलिस प्रशासनाने एक अभिनव योजना सुरू केली आहे. “ऑन द स्पॉट एफआयआर” ही योजना आहे. यातून घटनास्थळीच तक्रार नोंदणीची सुविधा मिळणार आहे.
या योजनेंतर्गत, दखलपात्र गुन्हा घडल्याची माहिती मोबाईल किंवा अन्य माध्यमातून मिळाल्यास, पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि डीबी पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचणार आहेत. त्यांच्या सोबत लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटर आदी उपकरणांनी सुसज्ज शासकीय वाहन असेल.
घटनास्थळीच तक्रार संगणकावर नोंदवली जाईल, त्याची प्रिंट काढून तक्रारदाराची सही घेतली जाईल आणि नंतर ही तक्रार स्कॅन करून संबंधित पोलिस ठाण्याच्या ई-मेलवर पाठवली जाईल, अशी माहिती SP पानसरे यांनी दिली. या योजनेच्या माध्यमातून पोलिसांकडून महिलांवरील अत्याचार, बालकांवरील गंभीर गुन्हे,ज्येष्ठ नागरिकांवरील अन्याय यांसारख्या गंभीर घटनांमध्ये तात्काळ एफआयआरची नोंदणी आणि कारवाई शक्य होणार आहे.
ही योजना पोलीस सेवेत पारदर्शकता आणणारी ठरेल आणि सामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित व सुखकर बनवेल, असा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी यावेळी व्यक्त केला.








