Officer in the role of father of the bride : विधवा व एकल महिलांचा विवाह सोहळा १२ एप्रिलला
Buldhana विधवा व एकल महिलांचा पुनर्विवाह सोहळा १२ एप्रिलला बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्यात प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कन्यादान करणार आहेत. तर प्रा. डी. एस. लहाने व मानस फाउंडेशन वर पित्याच्या भूमिकेत असणार आहेत.
या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यासंदर्भातील नियोजन बैठक शिवशाही पतसंस्था येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या शाहीनाताई पठाण होत्या. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त गजानन घीरके, मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी. एस. लहाने, पत्रकार गणेश निकम, प्रज्ञाताई लांजेवार, प्रा. ज्योती पाटील, प्रतिभा भुतेकर, सुरेखा सावळे, मनीषा वारे, अनिता कापरे, पत्रकार संदीप वानखेडे, संदीप जाधव, गौरव देशमुख, गजानन मुळे, किरण पाटील, पंजाबराव गवई यांची उपस्थिती होती.
Chikhali Grampanchayat : सरपंचाच्या विरोधात बहुमताने अविश्वास!
यावेळी विविध समित्यांचे गठन करण्यात आले. विधवा महिलांसाठी आयोजित हा विवाह सोहळा आद्य स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांच्या कार्याची आठवण करून देणारा असल्याचे प्रा. शाहीनाताई पठाण यांनी सांगितले. विवाह इच्छुक जोडप्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रा. डी. एस. लहाने आणि गजानन घीरके यांनीही आपले विचार मांडताना सांगितले की, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.
हा विवाह सोहळा १२ एप्रिल रोजी सकाळी १० ते १ या वेळेत सैनिक मंगल कार्यालय, बुलढाणा येथे पार पडणार आहे. सहभागी होणाऱ्या जोडप्यांना संसार उपयोगी भांडी, विमा कवच, पोशाख, मंगळसूत्र तसेच अन्य साहित्याची मदत केली जाणार आहे.
बुलढाण्यातील सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी आणि व्यापारी वर्ग या उपक्रमासाठी पुढे आले आहेत. विशेष म्हणजे, अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळ देत या सोहळ्यात स्वतः कन्यादान करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मानस फाउंडेशनचे प्रा. डी. एस. लहाने, जे याआधीही एकाच वेळी दहा दहा मुलींचे विवाह लावून देत पालकत्वाची भूमिका पार पाडली आहे, ते यंदाही ‘वरबाप’ म्हणून पुढे सरसावले आहेत.