Farmers protest for loan waiver: राज्यभर मशाल व टेंभा आंदोलन, अकोल्यात कार्यकर्ते ताब्यात
अकोला :शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने प्रहार संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. अकोला व अमरावती जिल्ह्यात प्रहार पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. अकोला आंदोलन करण्यापूर्वीच प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
प्रहारच्या आंदोलनाचा पहिला सूर नाशिकमध्ये उमटला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर रात्री मशाल पेटवून आंदोलन करण्यात आले. या माध्यमातून सरकारला जाग आणण्याचा निर्धार कडूंनी व्यक्त केला. राज्यभरात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवून आंदोलन केले.
Dattatray Bharane : क्रीडामंत्री म्हणाले, मुलांना खेळू द्या, पैसे कमी पडू देणार नाही!
दरम्यान, अकोला येथे आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी निघालेले प्रहार पदाधिकारी मनोज पाटील व त्यांचे सहकारी यांना डाबकी रोड पोलिसांनी रात्री आठ वाजता ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, काही काळ पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा अत्यंत गंभीर असून, सरकारकडून केवळ आश्वासनांची लळा लावली जात असल्याचा आरोप बच्चू कडूंनी केला. “सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक महिने उलटले, पण शेतकऱ्यांसाठी एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. शेतकरी अडचणीत असताना सरकार गप्प का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
प्रहारच्या म्हणण्यानुसार, हे आंदोलन तर केवळ सुरुवात असून, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र होईल. “शेतकरी हा देशाचा कणा आहे, त्याच्यावर अन्याय झाल्यास प्रहार गप्प बसणार नाही,” असा निर्धार बच्चू कडूंनी व्यक्त केला.
Sandip Joshi : शहरातील पाणी प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींची बैठक घ्या !
या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं दिसत आहेत.