Sudhir Mungantiwar : म्हणाले, बॅंकेच्या अधिकाऱ्यांना जेलमध्येच जावं लागेल
Chandrapur Bank : चंद्रपूरमध्ये १५ व १६ ऑक्टोबर १९५६ ला विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः दिक्षाभूमीवर आले. हात ऊंचावून सांगितलं की, चंद्रपूरच्या भूमीमध्ये शोषीतांवर अन्याय होता कामा नये. आणि आता त्याच चंद्रपूर जिल्ह्यात अनुसूचित जातीवर अशा पद्धतीने अन्याय होत असेल, तर ही निश्चितपणे अतीशय गंभीर बाब आहे. या प्रकाराला अॅट्रॉसीटी कायदा लागू होतो. उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार बॅंकेच्या अधिकाऱ्यांना जेलमध्येच जावं लागेल, असे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
बॅंकेच्या संदर्भात बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या पदभरतीमध्ये सुरू असलेल्या प्रकार निंदनीय आणि धक्कादायक आहे. भरती प्रक्रियेमधून आरक्षणच संपवण्याचा हा कुटील डाव आहे. या प्रकाराविरोधात विविध संघटनांचे व प्रवर्गांचे नेतृत्व करणारे लोक उपोषण करत आहेत. अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, महिला या सर्वांचे प्रतिनिधीत्व करणारे या विरोधात उभे ठाकले आहेत. ही बॅंक समाजाची आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांची आहे. या बॅंकेत प्रवर्गांना आरक्षण नाही. लाडक्या बहीणींनी आमचं सरकार आणलं. त्या बहीणींनाही आरक्षण नाही, हे धक्कादायक आहे.
उपविधीचे दाखले देऊन उपोषणकर्त्यांनी मला ही माहिती दिली. त्यानंतर लगेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. त्यांना विनंती केली की सरकार म्हणून यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात संविधानाने दिलेल्या अधिकारांवरच आक्रमण केले जात आहे. अशा वेळी शोषीत, वंचितांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण कुठल्याही परिस्थितीत एकाही मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तीवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली.
उपोषणकर्त्यांनी ओबीसी आयोगाच्या अध्यक्षांनाही पत्र दिलेलं आहे. अनुसूचित जाती आयोगालाही पत्र देणार आहेत. शोषीतांच्या अधिकारावर घाला घालण्याचा प्रयत्न झाला, तर चंद्रपूर जिल्ह्यातील जनता अशांना झटका दिल्याशिवाय राहणार नाही. व्यवस्थापन कसेही असू द्या, त्यांना या उपोषणकर्त्यांसमोर झुकावेच लागेल, असेही आमदार मुनगंटीवार म्हणाले.
मागासवर्गीय संघटना एकवटल्या..
मागासवर्गीय समाज संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता एकवटले आहेत. यामध्ये आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती अंतर्गत कुणबी एकता मंचचे अध्यक्ष इंजि. दिलीप झाडे, जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली,राष्ट्रीय तेली समाज संघटनेचे अध्यक्ष राजेश बेले, भोई समाज संघटनेचे अध्यक्ष बंडु हजारे, स्वराज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक सुर्या अडवाले, पीपीआयडी, चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षा नभा वाघमारे, धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष संजय कन्नावार, गोंडी धर्मिय समाज संघटनेचे नेते रमेश मेश्राम, वाहतूक सेनेचे महेश वासलवार, झाडे सुतार समाज अध्यक्ष मंगेश बुरडकर, महाराष्ट्र नाभिक संघ दिनेश एकवनकर, अहिर समाज संघ अध्यज अनुप यादव, पांचाळ सुतार समाज संघटनेचे अध्यक्ष मनोज तांबेकर, ओबीसी सेवा संघांचे सरचिटणीस राजु कुकडे, सुनील गुढे एकवटले आहेत.