Breaking

Akola Airport : अमरावती विमानतळाला अकोल्यातून विरोध!

Call to boycott the inauguration of Amravati Airport : उद्घाटनाच्या विरोधात बहिष्काराचे आवाहन, पहिला दावा अकोल्याचा असल्याचा मुद्दा

Akola पश्चिम विदर्भातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्येच आता विमानतळावरून वाद निर्माण झाला आहे. पहिले आमचे विमानतळ व्हायला हवे होते, असा दावा अकोल्याने केला आहे. येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अमरावती विमानतळाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन लोकांना केले आहे. त्यामुळे आता आजुबाजुच्या दोन जिल्ह्यांमध्येच एका नव्या विषयावरून वाद छेडला गेला आहे.

अकोला जिल्ह्यातील नागरिकांच्या विमानतळ उभारणीच्या दीर्घकाळच्या मागणीला अद्यापही न्याय मिळालेला नाही. अशातच १६ एप्रिल रोजी अमरावती येथे होणाऱ्या विमानतळ उद्घाटन समारंभाचा अकोला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी बहिष्कार करावा, असे आवाहन प्रमुख सामाजिक कार्यकर्ते व जाकरिया फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद जाकरिया यांनी केले आहे.

Amravati Airport : ऑक्टोबरपर्यंत नाईट लँडिंगची शक्यता!

जाकरिया यांनी सांगितले की, “अकोला जिल्ह्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. औद्योगिक आणि नागरी दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेल्या अकोला जिल्ह्याला विमानतळापासून वंचित ठेवणे म्हणजे अन्याय आहे.”

ते पुढे म्हणाले, “जवळच्या अमरावतीमध्ये विमानतळाचे उद्घाटन होत असताना अकोल्यातील लोकप्रतिनिधींनी त्यात सहभागी होणे म्हणजे जिल्ह्याच्या आत्मसन्मानाचा अपमान ठरेल. त्यामुळे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक आणि स्थानिक प्रतिनिधींनी उद्घाटन समारंभाचा पूर्ण बहिष्कार करावा, अशी आमची मागणी आहे.”

जकरिया यांनी स्पष्ट केले की, हा बहिष्कार कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नसून, अकोल्याच्या लोकशाही हक्कांची आठवण करून देण्यासाठी घेतलेले एक शांततामय पण प्रभावी पाऊल आहे. अकोला येथील शिवणी विमानतळाचे विस्तारीकरण करण्याचा प्रश्न मागील १० वर्षांपासून प्रलंबित आहे. या संदर्भात स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी सातत्याने आंदोलन व पाठपुरावा केला आहे.

Ravi Rana : १११ फूट उंच हनुमान मूर्ती, उभारणी अंतिम टप्प्यात !

विमानतळासाठी आवश्यक असलेले भूमी संपादन, धावपट्टी वाढ, आणि संरचना विकासाचे प्रस्ताव शासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी अकोल्याला अजूनही नियमित विमानसेवांपासून वंचित राहावे लागत आहे. अकोला हे पश्चिम विदर्भातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असूनही, येथे हवाई संपर्क सुविधा नाही, ही मोठी विसंगती आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच अकोल्यातील जनता आणि कार्यकर्ते हा प्रश्न फक्त विकासाचाच नव्हे, तर स्वाभिमानाचा मुद्दा मानून सातत्याने आवाज उठवत आहेत.