38 cyclists, including five women travelling by cycle to Pandharpur : राज्यभरातून ५ हजार सायकलपटूंचा सहभाग
Amravati आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अमरावती सायकल असोसिएशनच्या ३८ सायकलपटूंनी अमरावती ते पंढरपूर हे सुमारे ६०० किलोमीटरचे अंतर चार दिवसांत पार केले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर २१ जूनला राज्यभरातील ५ हजार सायकलपटू पंढरपुरात एकत्र आले आणि ‘सायकल रिंगण सोहळा’ने चंद्रभागा घाटावर एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळाली.
अमरावतीच्या पाच जिज्वेषी महिला सायकलपटूंचा सहभाग
अमरावती सायकल असोसिएशनच्या नियमित सायकलस्वार महिला वर्षा सदार, शालिनी महाजन, दिव्या मेश्राम, जयमाला देशमुख आणि शालिनी सेवानी यांनीही या प्रवासात सक्रीय सहभाग नोंदवला. “घरच्यांचा पाठिंबा आणि अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी व सचिव अतुल कळमकर यांनी दिलेला आत्मविश्वास यामुळे आम्ही हा सायकल प्रवास आत्मविश्वासाने पूर्ण केला,” असं या महिला सायकलपटू सांगतात.
Bacchu kadu : जिल्हा बँकेत अध्यक्ष बच्चू कडू यांचा मनमानी कारभार
प्रवासात वादळ-पावसाशी झुंज
१८ जून रोजी श्री अंबादेवी व एकविरा देवीचे दर्शन घेऊन या सायकलवारीला सुरुवात झाली. पहिला मुक्काम वाशिम जिल्ह्यातील कामारगाव येथे झाला. त्या पुढे वाशीममार्गे प्रवास सुरू राहिला. रस्त्यांची खराब अवस्था, वादळ आणि पावसाचा सामना करतही ‘जय हरी विठ्ठला’च्या जयघोषात सायकल चालवताना कुठलाही ताण जाणवला नाही, असं वर्षा सदार सांगतात. “पुरुष सहकाऱ्यांची मदत आणि आमचा आत्मविश्वास यामुळे ६०० किलोमीटरचा प्रवास शक्य झाला,” असं शालिनी सेवानी यांनी अनुभव कथनात म्हटलं.
अमरावती ते पंढरपूर : एक ऐतिहासिक उपक्रम
अमरावती सायकल असोसिएशन गेल्या अनेक वर्षांपासून चिखलदरा, मुक्तगिती यांसारख्या ठिकाणी सायकल प्रवास आयोजित करत आहे. मात्र, यंदा प्रथमच थेट पंढरपूरची वारी सायकलवरून करण्याचा निर्णय घेण्यात आला. “या उपक्रमात राज्यातील विविध जिल्ह्यांतील सायकलपटूंनीही सहभाग नोंदवला,” अशी माहिती असोसिएशनचे सदस्य राजू महाजन यांनी ‘ईटीव्ही भारत’ला दिली.
पंढरपुरात उत्साहात रिंगण सोहळा
चंद्रभागेच्या तीरावर पार पडलेल्या या रिंगण सोहळ्यात सायकलपटूंनी विठ्ठलनामाच्या गजरात सहभागी होत, कीर्तनात मनोभावे सहभागी होत एक वेगळा अध्यात्मिक अनुभव घेतला. “सायकलवरील हा प्रवास केवळ आरोग्यासाठी नाही, तर मनाला अध्यात्मिक समाधान देणारा ठरला,” असं शालिनी महाजन यांनी सांगितलं.