Clashes between Thackeray group and Samajwadi Party workers : अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध; अकोल्यात ‘शेण फेको’ आंदोलनादरम्यान वाद
Akola नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाचे समर्थन करणे चांगलेच भोवले आहे. “औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता,” असे वादग्रस्त विधान त्यांनी सोमवारी विधिमंडळ परिसरात केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यभरात त्याच्या निषेधार्थ विविध आंदोलनं केली जात आहेत. अकोल्यातही ठाकरे गटाकडून अबू आझमी यांच्या विरोधात ‘शेण फेको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजवादी पक्षाचे पदाधिकारी आंदोलन स्थळी आल्याने शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व त्यांच्या धक्काबुक्की झाली.
यावेळी, शिवसैनिकांनी अबू आझमी यांच्या फोटोला शेण फासून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, आझमी यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी केली. मात्र, हे आंदोलन सुरू असताना समाजवादी पक्षाचे काही कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलनाचा विरोध करत आझमी यांचा फोटो खाली काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली.
या गोंधळात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेश मिश्रा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दुसरीकडे, अबू आझमी यांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनांमुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे महानगर अध्यक्ष इब्राहिम खालिद यांनी केला आहे.
या आंदोलनात अनिल परचुरे, पंकज जायले, शरद तुरकर, गजानन चव्हाण, प्रकाश वानखडे, सागर भारुका, नितीन मिश्रा, लक्ष्मण पंजाबी, मंजुषा शेडके, सीमा मोकळकर, पूजा मालोकार, शुभांगी भटकर, यशवंत सवई, बबलू उके, सतीश नागदिवे, सुनील दुर्गिया, देवा गावंडे, रोशन राज, राजेश इंगळे, राजेश पिसे, बाळू पाटील ढोले, शुभम कडु, रुपेश ढोरे, गोपाल लव्हले, सतीश देशमुख, मंगेश इंगळे आदींची उपस्थिती होती.