Trisha from Nagpur seriously injured in zip line accident in Manali : ३० फुट उंचावरून पडली खाली, पायांना अनेक फ्रॅक्चर
Nagpur : सुट्यांमध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासोबत अॅडव्हेंचरचा थरार अनुभवण्यासाठी अनेक लोक उन्हाळ्यात पर्यटनाला जात असतात. पण यामध्ये जराशीही चूक झाल्यास ती जिवावर बेतू शकते. असाच एक अपघात मनालीमध्ये झाला. यामध्ये नागपूरची एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
नागपूरचे रहिवासी प्रफुल्ल बिजवे हे पत्नी आणि मुलगी त्रिशासोबत उन्हाळी सुट्या घालवण्यासाठी मनालीला गेले होते. गेल्या रविवारी (ता. ८ जून) त्रिशा झिप लाईनिंग करत असताना अचानक केबल तुटली आणि त्रिशा जमिनीवर पडली. यामुळे तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. झिप लाईनची केबल ३० फूट उंचावरून होती. येवढ्या उंचीवरून पडल्याने त्रिशाच्या पायाला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालेले आहेत.
Student passes : आता एसटीच्या पासेससाठी होणार नाही विद्यार्थ्यांची पायपीट !
गंभीर जखमी त्रिशावर सुरूवातीला मनाली व त्यानंतर चंदीगड येथे उपचार करण्यात आले. सद्यस्थितीत नागपुरातील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. झिप लाईनच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. अपघातानंतर कोणतीही तातडीची मदत मिळाली नाही, असा आरोप बिजवे कुटुंबीयांनी केला आहे.
काय आहे झिप लाईन ?
उंच बांधलेल्या दोरीवरून घसरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची अॅडव्हेंचर अॅक्टीव्हीटी म्हणजे झिप लाईन. मनाली येथे झिप लाईन सोलांग व्हॅली आणि इतरही ठिकाणी आहे. या अॅक्टीव्हीटीमध्ये पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात थरार अनुभवू शकतात. झिप लाईनमधून जाताना निसर्गाची विहंगम दृष्ये दिसतात. त्यामुळे पर्यटकांचा कल ही अॅक्टीव्हीटी करण्याकडे अधिक असतो. झिपलाईन करताना योग्य उपकरणे वापरण्याच्या सुचना दिल्या जातात. अनुभवी मार्गदर्शकांसोबतच झिपलाईन करणे सुरक्षित असते. पण यंत्रणाच सदोष असल्यास कितीही खबरदारी घेतली तरी असे अपघात होतात.