Woman in Mehkar, Buldhana Alleges Gang Rape : बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील घटना, अद्याप एकही अटक नाही
Buldhana : बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आदिवासी पारधी समाजातील एका महिलेवर दोन पोलिस कर्मचारी आणि चार गावकऱ्यांनी मिळून सलग सात दिवस सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणाची पीडितेने बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे लिखित तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपअधीक्षक याप्रकरणी तपास करीत आहेत. मात्र, तक्रार दाखल झाल्यापासून तीन महिने उलटूनही कोणत्याही संशयिताला अटक झालेली नाही.
पीडित आदिवासी महिलेचे कुटुंब गावठाण जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्यांनी ‘सर्वांसाठी घरे 2022’ या शासन परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीकडे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमित करण्याची मागणी केली होती. मात्र, ग्रामपंचायतीने त्यांना बेकायदेशीरपणे नोटीस बजावून आणि पोलीस संरक्षण घेऊन त्यांचे अतिक्रमण हटवले. यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे. फाटक्या पत्र्यांच्या झोपडीत कसेबसे जीवन जगत आहे. या दयनीय परिस्थितीत काही पोलीस कर्मचारी आणि गावकऱ्यांनी संगनमताने पीडित महिलेला शेतात नेऊन सात दिवस अत्याचार केल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार – फडणवीस भेटीची होणार फलश्रुती !
पीडित महिलेने 4 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली. आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची महिलेची विनंती मान्य करत बुलढाणा पोलीस अधीक्षकांना सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणाची सुनावणी मुंबई येथे होणार आहे. आयोगाने पीडितेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
New controversy : ‘देवाभाऊ’ जाहिरातींवरून नवा वाद! रोहित पवारांचा गौप्यस्फोट !
ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी हक्कांसाठी लढणाऱ्या विविध संघटनांनी याप्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पीडित महिलेला तातडीने न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे. आयोगाच्या अहवालानंतर या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








