Pregnant woman from Pardhi community beaten with sticks in Ghospuri dist. Ahilyanagar : पारधी समाजातून संताप, ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाईची मागणी
Ahilyanagar : पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील घोसपुरी गावात घडली आहे. येथील आदिवासी पारधी समाजातील गर्भवती महिला कविता स्वामी चव्हाण यांच्यावर काही गावगुंड आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी हल्ला केला. त्यांच्या राहत्या घराची तोडफोड करून जातीवाचक शिवीगाळ केली. ते येवढ्यावरच थांबले नाहीत, तर कविता यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या अमानुष घटनेमुळे पारधी समाजात प्रचंड संताप उसळला आहे. पारधी समाजाच्या विविध सामाजिक संघटनांनी तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
घोसपुरी गावातील कविता स्वामी चव्हाण या गर्भवती महिलेवर काही गावगुंडांनी जातीवाचक शिवीगाळ करत अमानुषपणे मारहाण केली. या घटनेत स्थानिक लोकप्रतिनिधींचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप आहे. कविता गर्भवती असतानाही कोणतीही दया न दाखवता त्यांना मारहाण करण्यात आली. ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ही घटना गावातील सामाजिक तणाव आणि भेदभावाच्या मानसिकतेचे दर्शन घडवते.
Maratha movement : अंतरवली मारहाणीमागे फडणवीसच; 29 ऑगस्टला मुंबई धडकणार !
पारधी समाजातील अनेक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. “हा केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नाही, तर संपूर्ण पारधी समाजाच्या अस्मितेवर आणि मानवी हक्कांवर झालेला हल्ला आहे”, असे पारधी समाजाच्या सामाजिक कार्यकर्ता वैशाली पिंपरे यांनी सांगितले. आदिवासी पारधी समाजाने तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्ट (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९) अंतर्गत गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासोबतच पीडित महिलेला तात्काळ वैद्यकीय आणि कायदेशीर मदत पुरवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कलम ३(१)(r) आणि ३(१)(s) नुसार, जातीवाचक शिवीगाळ आणि शारीरिक हिंसाचारासाठी शिक्षा होऊ शकते. तसेच, गर्भवती महिलेवर हल्ला करणे हा भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३१२ आणि ३२३ अंतर्गतही गंभीर गुन्हा आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिस प्रशासनावर तात्काळ कारवाईचा दबाव वाढला आहे. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांकडून प्रकरण दाखल करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला.
RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात कोणताही बदल नाही !
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांना काही सामाजिक कार्यकर्ते भेटून नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पारधी समाजावर गावगुंडांकडून अत्याचार केला जात असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वीही राजकीय हस्तक्षेपामुळे अशा घटनांमध्ये पोलिसांनी विलंब केल्याची उदाहरणे आहेत. ज्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आणि पारधी समाजातील नेत्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. “जर पोलिसांनी २४ तासांत एफआयआर दाखल केला नाही, तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने आंदोलन करू,” असे पारधी समाज संघटनेच्या प्रतिनिधीने जाहीर केले.
Water crisis : शेगाव तालुक्यातील ३८ गावे पाण्याविना, आरोग्याला धोका
स्थानिक पातळीवर सामाजिक समतेचे आणि जातीविरोधी प्रबोधनाचे कार्यक्रम राबवावेत. सामाजिक संघटनांनी पीडितेला कायदेशीर मदत पुरवावी आणि प्रकरणाचा पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेने अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडले आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून पीडितेला न्याय द्यावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नगरच्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.