Breaking

Adv. Dharmapal Meshram : अल्पवीय मुलीवरील अत्याचाराने संतापले आयोगाचे उपाध्यक्ष

 

Commission vice-chairman outraged by abuse of minor girl : ॲड. मेश्राम म्हणाले, ‘माणुसकीला काळीमा फासणारी घटना’

Gondia जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील शेतशिवारात 9 फेब्रुवारी 2025 रोजी अनुसूचित जातीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला जाळून मारण्यात आले. ही घटना अत्यंत अमानवीय व मानवतेला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा मी निषेध करतो, अशा संतप्त भावना राज्याचे अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्य्क्त केल्या.

विकृत मानसिकतेच्या या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अल्पवयीन मुलगी ही अनुसूचित जाती प्रवर्गाची आहे. आरोपी शकील मुश्ताक सिद्धीकी विकृत मानसिकतेचा आहे. त्याच्या विरोधात आरोपपत्र तयार करुन त्याला जामीन मिळू नये असे पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील यांना निर्देशीत केले असल्याचे ते म्हणाले.

आमगाव तालुक्यातील मृत अल्पवयीन मुलीच्या स्वगावी मानेकसा येथे जाऊन पालक व कुटूंबियांची सांत्वना भेट घेतली. अत्यंत गरीब असलेले हे कुटूंब उदरनिर्वाहसाठी जवळपास 40 कि.मी. अंतरावरील गोरेगाव तालुक्यातील विटभट्टीवर मोलमजुरीचे काम करीत होते. दरम्यान त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन माणुसकीला लाजविणारे कृत्य त्या आरोपीने केले. तसेच तिच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ असताना जीवंत जाळून तिचा खून केला. अशा आरोपीला सुरक्षीत समाजाच्या दृष्टीने समाजात वावरण्याचे हक्क नाही, असंही ते म्हणाले.

या बैठकीत महसूल विभाग, जिल्हा महिला व बालकल्याण, पोलीस विभाग, सामाजिक न्याय विभाग आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात अनेक अनाधिकृत विटभट्टया सुरु असल्याची माहिती मिळाली. या अनाधिकृत विटभट्ट्यांची कायदेशीर प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी तपासावी असेही त्यांनी निर्देशीत केल्याचे सांगितले.

गोंदिया जिल्ह्यात किती बाल कामगार काम करीत आहेत, यासंदर्भातील सर्वेक्षणाची माहिती तात्काळ अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे सादर करावे असेही निर्देशीत केले आहे. या प्रकरणी संबंधित कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केल्यावर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.