Licenses of 72 agricultural centers that cheated farmers cancelled : बुलढाण्यात कृषी विभागाचा कारवाईचा बडगा; बोगस बियाणांची विक्री महागात
Buldhana खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या प्रकारांना चाप लावत कृषी विभागाने मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर एकूण ९३ परवाने निलंबित करण्यात आले असून त्यापैकी ७२ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांच्या निर्देशानुसार ही कठोर कारवाई करण्यात आली.
शेतकऱ्यांना मुदतबाह्य बी-बियाणे, कीटकनाशके आणि जादा दराने खते विक्री करणाऱ्या केंद्रांमध्ये पराग शेतकरी कृषी सेवा केंद्र, धाड यांच्यावर विशेषतः लक्ष केंद्रीत करण्यात आले. गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गणेश सावंत यांच्या तपासणीत दोष आढळल्याने या केंद्राचे सर्व परवाने तातडीने निलंबित करण्यात आले. तसेच, वैभव कृषी सेवा केंद्र, रायपूर आणि साई कृषी सेवा केंद्र, पांगरी (ता. बुलडाणा) यांच्यावरही खत विक्रीतील अनियमिततेमुळे कारवाई करण्यात आली आहे.
काही स्थानिक शेतकरी संघटनांनी आणि राजकीय मंडळींनी ही कारवाई “उशीरा का झाली?” असा सवाल उपस्थित केला असून, काही विक्रेत्यांवर राजकीय दबावाखाली दुर्लक्ष झाल्याचा आरोपही चर्चेत आहे. खरीप हंगामात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये म्हणून कृषी विभागाची विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. जिथे बोगस बी-बियाणे किंवा महाग दराने खते विक्री केल्याचे आढळते, तिथे तातडीने कडक कारवाई केली जात आहे.
Amol Mitkari : एकाच ऑटोत पंधरा मुलं? विद्यार्थ्यांच्या जीवाशी रोजच होतो खेळ!
“शेतकऱ्यांना वेळेवर व दर्जेदार खते, बियाणे व कीटकनाशके मिळण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. नियमभंग करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी दिला आहे.
राजकीयदृष्ट्या ही कारवाई शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचा सूर सत्ताधारी पक्षातून उमटतोय, तर विरोधकांनी ‘वर्षानुवर्षे दुर्लक्ष करून आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेली ही उशिराची जाग’ असा टोला लगावला आहे.