Ajit Pawar : अजित पवार म्हणतात ‘आम्ही बाबासाहेबांचे पाईक’

Ajit Pawar says We are Dr. Babasaheb Ambedkar’s followers : संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवणार

Mumbai : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘आम्ही बाबासाहेबांचे पाईक’ हा विशेष जनजागृतीपर उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनाील तटकरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून साकारत असलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या मानवी हक्क, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचे महात्म्य जनतेपर्यंत पोहोचवणे, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे महत्त्व अधोरेखित करणे, तसेच नव्या पिढीपर्यंत त्यांच्या विचारांचे प्रभावीपणे प्रबोधन करणे हे आहे.

BJP Congress : शेगावमध्ये शहराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात?

या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय संविधानाची उद्देशिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यातील जनतेला उद्देशून लिहिलेले पत्र हे एकत्रित स्वरूपात राज्यातील विविध जिल्हे, शहरे, गाव-खेड्यांतील सर्व प्रमुख ठिकाणी लावण्यात आले आहेत. या ठिकाणांमध्ये शाळा, महाविद्यालये, वाचनालये, बुद्धविहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे व स्मारके, बाजारपेठा, महत्त्वाचे चौक, गृहनिर्माण सोसायट्या व सार्वजनिक वर्दळीची ठिकाणे यांचा समावेश आहे.

संविधान हा केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा मूलभूत पाया आहे आणि तो सर्वसामान्य जनतेपर्यंत समजेल, अशा पद्धतीने हे संदेश पोहोचविण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आम्ही आमच्या पक्षाची नैतिक जबाबदारी मानतो. सद्यस्थितीत समाजातील विविध घटकांमध्ये अदृश्य दरी आहे, असे आभासी वातावरण निर्माण होत चालले आहे.

समाजामध्ये डॉ.बाबासाहेबांनी दिलेली मानवी हक्क, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्ये रुजणे अत्यावश्यक आहे याकरिता बाबासाहेबांचे विचार आणि त्यांच्या मूल्यांवर आधारित असलेली भारतीय राज्यघटनेची उद्देशिका जनतेपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवित असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.
आमचा पक्ष शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपतो. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उद्दिष्ट असून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी या महान विचारवंतांची तत्त्वे सदैव मार्गदर्शक ठरतात आणि प्रत्येक नागरिकाने या तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

School security : ९८ टक्के जिल्हा परिषद शाळा सीसीटीव्ही विना!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान केवळ संविधानाच्या निर्मितीपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी भारतीय संसदेमध्ये सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विषमतेविरुद्ध ठाम भूमिका घेतली. पाणी, शेती, मजूर कायदे, महिला हक्क आणि धर्मनिरपेक्षता यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांनी दिलेले विचार आजही शासन आणि समाजासाठी मार्गदर्शक आहेत. त्यांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला आणि भारतीय लोकशाहीला एक मजबूत चौकट दिली, असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.