Ajit Pawar strongly criticizes the opposition : अजित पवारांनी लगावला विरोधकांना टोला
Mumbai : मागील पाच वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राची काहीच प्रगती झाली नाही, असं भास्कर जाधव यांना म्हणायचं आहे का? उद्धव ठाकरे यांच्या मुखमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या काळात काहीच कामे झाली नाहीत, असं म्हणायचं आहे का, असे प्रश्न करत उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना सभागृहात आज सडेतोड उत्तर दिले.
अर्थसंकल्पावर आज (१७ मार्च) बोलताना अजित पवार म्हणाले, राज्य मागे गेलं, असं विरोधक म्हणतात. पण आमच्याही कार्यकाळात राज्य पुढे नेण्याचंच काम केलं. त्यातल्या त्यात गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग जास्त होता, हे मान्यच करावं लागेल. आमच्या कामाचा झपाटा जबरदस्त होता. कारण हा झपाटा नसता, तर तुम्ही हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या संख्येने निवडून आले नसते, असे म्हणत विरोधकांना जोरदार टोला लगावला.
२०, १५ आणि १० अशा संख्येने तुमचे लोक निवडून आले. काही काही तर अतिशय कमी फरकाने निवडून आले. काहींना तर अक्षरशः पोस्टल बॅलेट पेपरने वाचवलं. हे त्यांचं नशीबच म्हणावं लागेल. तुम्ही काही काळ सत्तेत होता. तुमचं श्रेय नाकारण्याची माझी वृत्ती नाही. कारण तेव्हा मीसुद्धा तुमच्यासोबत होतो. चांगल्याला चांगलं म्हणण्याचा स्वभाव आपला असला पाहिजे. महाराष्ट्राची ती परंपरा आहे. महाराष्ट्र कसा असला पाहिजे, हे आपल्या वरिष्ठांनी आपल्याला शिकवले आहे, असे पवार म्हणाले.
या सभागृहातील अनेक सदस्यांना अर्थसंकल्पावरील बाबींची जाण आहे. त्यांनी मांडलेल्या प्रश्नांना मी माझ्या पद्धतीने उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थसंकल्पाला दोष देण्याचा अधिकार विरोधकांना लोकशाहीने दिलेला आहे. त्यांनी दोष दिला तरी चालेल, त्याचं वाईट वाटण्याचं काही एक कारण नाही. परंतु जिव्हारी लागेल, अशा प्रकारे कुणावर अन्याय होईल किंवा देशाच्या विकासाच्या कार्यामध्ये केलेल्या कामाप्रती ती कृतघ्नता ठरेल, अशी विधाने करू नये, असे आवाहन अजित पवार यांनी विरोधकांना केले.