Ajit Pawar : ‘माझा संबंध नाही’ म्हणाले पण सिंचन ते जमीन…

Ajitdada is again accused of corruption : अजितदादांवर पुन्हा घोटाळ्याचा शिक्का !

Mumbai : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा घोटाळ्याचा शिक्का उमटल्याची चर्चा रंगली आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी केली असल्याचा वाद उभा राहिल्यानंतर अखेर अजित पवारांना पुढे येऊन व्यवहार रद्द करण्याची घोषणा करावी लागली. “माझा या व्यवहाराशी काही संबंध नाही” असा खुलासा त्यांनी केला असला तरी, सिंचन घोटाळ्याप्रमाणेच या जमीन खरेदी प्रकरणानेही अजित पवारांच्या राजकीय प्रतिमेवर गडद सावली टाकली आहे.

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “तीन-चार महिन्यांपूर्वी कानावर काही आले होते, पण मला त्याबाबत काही माहिती नव्हती.” मात्र त्यांच्या मुलाच्या नावावर झालेल्या या जमीन खरेदी व्यवहारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. महारवतन म्हणून मिळालेली ही जमीन विक्रीसाठीच पात्र नसल्याचा आरोप करण्यात आला. शिवाय या जागेवर आयटी पार्क विकसित करण्याचे दाखवून मुद्रांक शुल्कात सवलत घेतल्याचेही समोर आले. सरकारी यंत्रणांनी या व्यवहारात दाखवलेली गती आणि कृती पाहता, ‘वरून दबाव’ असल्याची चर्चा सुरू आहे.

Pune land scam : पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात नवीन वळण

या संपूर्ण वादामुळे अजित पवार पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधकांनी “सरकारी यंत्रणा पार्थ पवारांसाठी झुकते का?” असा सवाल उपस्थित केला आहे. केंद्र सरकारच्या नोटीसपर्यंत हा वाद पोहोचला असून, राज्यातील यंत्रणांवर या प्रकरणात दबाव असल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे.

अजित पवार यांचं नाव याआधीही सिंचन घोटाळ्यामुळे चर्चेत आलं होतं. २००६ नंतर राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याने सिंचन प्रकल्पांना गती देण्यात आली. मात्र सात-आठ वर्षांत तब्बल ७० हजार कोटी रुपये खर्च करूनही सिंचन क्षेत्रात केवळ १ टक्के वाढ झाली. या पार्श्वभूमीवर तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झाले.

या आरोपांमुळे संतप्त झालेल्या अजित पवारांनी २०१२ मध्ये अचानक राजीनामा दिला होता. “घोटाळ्याच्या आरोपांतून निर्दोष सिद्ध झाल्याशिवाय परतणार नाही,” असं जाहीर केल्यानंतरही ते फक्त ७२ दिवसांत पुन्हा मंत्रिमंडळात परतले. नंतरच्या राजकीय घटनांमध्ये त्यांना भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यावर ‘सिंचन घोटाळ्याचं अभय’ मिळाल्याचं म्हटलं गेलं.

अजित पवार हे वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. “धरणात पाणी नाही तर तिथे लघुशंका करु का?” आणि “रात्रीच्या भारनियमनामुळे लोकसंख्या वाढते” अशा विधानांमुळे ते अनेकदा टीकेचे धनी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवारांना “आता निवृत्त व्हा” असा सल्ला देताच त्यांनी पुन्हा राजकीय वाद ओढवून घेतला.

Local Body Elections : पहिल्या दिवशी ‘ड्राय डे’! राजकीय पक्षांचे ‘वेट अँड वॉच’

सिंचन घोटाळ्याने अजित पवारांची प्रतिमा कायमच डागाळली आहे. “सिंचनाचं पाणी कुठे मुरलं?” हा सवाल आजही त्यांच्याशी जोडला जातो. आता पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या जमीन खरेदी प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीवर नवी संकटाची सावली दिसते आहे. अजित पवारांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं सांगितलं असलं तरी, विरोधकांच्या नजरेत “सिंचन ते जमीन अजितदादांचा घोटाळा कायमचा इतिहासात नोंदला गेला” असं चित्र निर्माण झालं आहे.