Corrupt officials will not be forgiven : मुनगंटीवार यांच्या लक्षवेधीवर उपमुख्यमंत्र्यांचे उत्तर
गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना आठ दिवसात सुतासारखे सरळ करणार, असा दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरला आहे. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात लक्षवेधी Budget Assembly मांडली होती. सरकारची तिजोरी लुटणाऱ्या व निकृष्ट दर्जाचे तांदूळ लोकांना देणाऱ्या अधिकार्यांना किती दिवस पाठीशी घालणार? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला होता.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काही राईस मिलच्या माध्यमातून तांदळाच्या व्यवहारात गैरव्यवहार व काळाबाजार होत आहे. यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. शासकीय गोदामात आलेल्या तांदळाची परस्पर विक्री करून निकृष्ट दर्जाचा तादूळ रेशन दुकानांमध्ये पोहोचविला जातो. खाण्यासाठी अयोग्य असलेला तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमध्ये पोहोचविला जातो. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
Sudhir Mungantiwar : सर्व घटकांना सामावून घेणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प
यामागे मोठ रॅकेट असल्याचा आरोप करून मुनगंटीवार म्हणाले, निकृष्ट दर्जाचा तांदळाचा पुरवठा करणाऱ्या काही पुरवठादारांना काळ्या यादीत टाकलेले आहे. तसे असतानाही पुन्हा त्याच पुरवठादारांना कंत्राट का मिळत आहे? निकृष्ट दर्जाचा तांदूळ दिल्याबद्दल पुरवठादाराला ३० नोव्हेंबर २०२३ रोजी २ कोटी ७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. परंतु या दंडाची वसुली एक पैसाची झाली नाही, याकडेही मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं.
या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांना अटक करण्याची आवश्यकता आहे. गुन्हा करणाऱ्यांना धाक बसविण्याची आवश्यकता असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
मस्ती उतरवणार – उपमुख्यमंत्री
आमदार मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. ‘हा गंभीर प्रश्न आहे. याबाबत तातडीने बैठक घेतली जाईल. येत्या आठ दिवसांत यासंदर्भात निर्णय घेऊन अधिकाऱ्यांची मस्ती उतरवली जाईल. भ्रष्ट अधिकाऱ्यांना सुतासारखे करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन पवार यांनी यावेळी दिले.