
ajit-pawar-viman-apghat-amol-mitkari-sanshay-vyakt : आमदार अमोल मिटकरींच्या दाव्यांनी खळबळ
Mumbai: राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. अजित पवार यांच्या कथित विमान अपघाताबाबत बोलताना त्यांनी या घटनेमागे घातपाताचा कट असू शकतो का, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमानात आत्मघाती बॉम्बचा वापर झाला असावा का, तसेच विमानाचे पायलट संमोहित अवस्थेत होते का, अशी शंका व्यक्त केली.
मिटकरी यांनी सांगितले की अजित पवार ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते, त्या कंपनीबाबत आधीपासूनच अनेक प्रश्नचिन्हे होती. संबंधित कंपनीवर वर्षभरापासून बंदी असल्याचा दावा करत त्यांनी असेही म्हटले की, तरीसुद्धा 28 जानेवारी रोजी तेच विमान वापरासाठी देण्यात आले. या काळात त्या कंपनीच्या पायलटमध्ये दोन वेळा बदल करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
Mohan Bhagwat : ब्राह्मण असणे ही कोणतीही विशेष पात्रता नाही!
आमदार मिटकरी यांच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2025 मध्ये व्हीएसआर कंपनीने आपल्या प्रत्येक पायलटसाठी 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. एवढ्या मोठ्या रकमेचा विमा उतरवून पायलटला कोणतेही आमिष दाखवण्यात आले होते का, किंवा त्याला संमोहित करून एखादे टोकाचे कृत्य करण्यास भाग पाडण्यात आले होते का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पायलटने आपत्कालीन स्थितीत दिला जाणारा ‘मे डे’ कॉल न दिल्याचा मुद्दा उपस्थित करत मिटकरी यांनी संशय अधिक गडद केला. टेकऑफनंतर काही वेळातच विमान पुण्याच्या हद्दीत आणणे शक्य होते, मात्र तसे प्रयत्न झाले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे विमान कंपनीच्या भूमिकेवर मोठे प्रश्न निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.
India-US trade deal : भारत – अमेरिका अंतरिम व्यापार करारात शेतकऱ्यांच्या हितांना धक्का नाही
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी आपण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची वेळ मागितल्याचेही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील सर्व पैलू तपासले गेले पाहिजेत, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणावर कुटुंबीयांच्या वतीने आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेणार असल्याचेही मिटकरी यांनी सांगितले. 10 तारखेला होणाऱ्या या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाचे मुद्दे आणि उपलब्ध पुरावे मांडले जातील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या पत्रकार परिषदेवर केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.








