Ajit Pawar Remember you are accusing Modi and Fadnavis party : अजित पवार SSS… तुम्ही मोदी आणि फडणवीसांच्या पक्षावर आरोप करताय हे लक्षात ठेवा
Pune : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महायुतीत तणाव निर्माण झाला असून, या आरोपांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षावर आरोप करत आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावं, अशा शब्दांत रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना खडसावलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेल्या सात वर्षांत भाजपने प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलो आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
अजित पवार यांनी सर्वप्रथम स्वतःच्या पक्षाकडे आणि स्वतःच्या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे. आरोप-प्रत्यारोप कसे करायचे, हे त्यांनी आधी ठरवावे. आम्ही जर आरोप करायला सुरुवात केली, तर त्यांना फार मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल, याची त्यांनी काळजी घ्यावी, असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिला. तुम्ही ज्या पक्षावर आरोप करत आहात, तो नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा पक्ष आहे, हे विसरू नका, असंही ते म्हणाले.
रवींद्र चव्हाण यांनी यावेळी आगामी निवडणुकीच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष्ट केली. ही निवडणूक पुण्याच्या विकासासाठी असून, पुण्यातील जनतेला दर्जेदार नागरी सुविधा कोण देऊ शकते, हा खरा प्रश्न आहे. त्याच संदर्भात जनतेपर्यंत वस्तुस्थिती मांडण्यासाठी आपण आलो आहोत, असं त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील एनडीए सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकार हे गतिमान सरकार कसं असावं, याचं उदाहरण निर्माण करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या, मात्र आता निवडणुका होत असताना पुण्यात विकासकामांना वेग आला आहे. पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला असून, शहरात मोठमोठे प्रकल्प मार्गी लागले आहेत, असं चव्हाण यांनी सांगितलं. पुणे महापालिकेच्या स्थापनेपासून जी स्वप्नं पाहिली जात होती, ती पूर्ण करण्याच्या दिशेने मोदी सरकार आणि फडणवीस सरकार काम करत आहे, असा दावा त्यांनी केला.
पुणे मेट्रोच्या मुद्द्यावरूनही रवींद्र चव्हाण यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. पुणे महापालिकेत मेट्रोचा ठराव मंजूर झाला होता. मात्र केंद्र आणि राज्यात सत्ता असूनही महाविकास आघाडी सरकारला पुण्यात मेट्रो सुरू करता आली नाही. त्यांना ती सुरूच करायची नव्हती. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच पुण्यात मेट्रो सुरू झाली आणि आज ३३ किलोमीटरचं मेट्रो जाळं कार्यान्वित झालं आहे, असं रवींद्र चव्हाण यांनी ठामपणे सांगितलं.
अखेर कारनाम्यांना लगाम! शिंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे निलंबित
अजित पवार यांच्या आरोपांनंतर आणि त्यावर रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील राजकीय वातावरण तापलं असून, आगामी महापालिका निवडणुकीत या आरोप-प्रत्यारोपांचा थेट परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.








