NCP rally held in Amravati : राष्ट्रवादीच्या ‘विश्वास मेळाव्या’त उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा
Amravati समाजात एकोपा आणि सलोखा टिकून राहणे ही आपली परंपरा आहे. चांगले काही उभारण्यासाठी वेळ लागतो; मात्र विध्वंस आणि राखरांगोळी करण्यासाठी वेळ लागत नाही. त्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण करणारी दादागिरी, गुंडगिरी आणि दहशतगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. मात्र, हा इशारा नेमका कोणासाठी होता, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधी प्रांगणात अमरावती महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विश्वास मेळाव्या’त ते बोलत होते.
“ज्या गावच्या बोरी असतात, त्या गावात बाभळीही असतात; त्यामुळे कुणी वेगळे समजण्याचे कारण नाही,” असे सांगत त्यांनी समाजात शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले.
पवार पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभे केले, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने प्रत्येकाला मताचा अधिकार दिला. त्यामुळे शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी पुढे जाणे गरजेचे आहे. सरकारमध्ये मंत्री म्हणून शहरांचा विकास करण्याची जबाबदारी आमची आहे. मला विकासाचे राजकारण करायला आवडते. काही लोक स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जाती-जातींत वाद लावतात; याचा सर्वाधिक फटका गरीब आणि सामान्य नागरिकांना बसतो.
अमरावतीत जातीय सलोखा टिकून राहिला पाहिजे. कुणी भडकविण्याचा प्रयत्न केला, तर भडकू नका; संयम ठेवा. नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या मार्गाने पुढे जायचे आहे. त्यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले.








