ECS hospital in every district : राज्य शासन सकारात्मक; मंत्र्यांची कामगार संघटनेसोबत चर्चा
राज्यातील प्रत्येक कामगाराचा आर्थिक विकास आवश्यक आहेच. पण त्यासोबत सामाजिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवरही विकास झाला पाहिजे. त्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कारण कामगारांचे कल्याण हेच आमचे धोरण आहे, असा शब्द राज्याचे कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी दिला. त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात कामगार विमा रुग्णालय स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असंही ते म्हणाले.
मुंंबई येथे कामगार मंत्र्यांच्या दालनात आकाश फुंडकर यांनी संघटनांसोबत चर्चा केली. भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र व विदर्भ प्रदेश यांच्या शिष्टमंडळासोबत त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री सी. व्ही. राजेश, विदर्भ प्रदेशाध्यक्ष रवींद्र गणेशे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड. अनिल ढुमने आणि पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी भारतीय मजदूर संघाच्यावतीने 19 मागण्यांचे निवेदन मंत्री आकाश फुंडकर यांना देण्यात आले. त्या सर्व मागण्यांवर आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचे कामगार विषयक धोरण तयार करण्याबाबत कामगार संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल. कामगार कार्यालयामध्ये कर्मचारी भरती करण्यात येईल. असंघटित कामगारांच्या विकासासाठी निधी उभारण्याचे नियोजन आहे. या निधीच्या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी विमा, आरोग्य या योजना राबवण्याच्या शासनाच्या विचाराधीन असल्याचे मंत्री फुंडकर यांनी सांगितले.
भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी यावेळी विविध मागण्यांचे निवेदन फुंडकर सादर केले. कामगारांच्या समस्या, त्यांच्या अडचणी आणि कामगार संघटनांच्या मागण्या, त्यांच्या अंमलबजावणीची स्थिती याबाबत चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळाचे विदर्भ प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार, मंत्री हर्षल ठोंबरे, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री किरण मिलगीर, बाळासाहेब भूजबळ, सचिन मेगांळे, महिला प्रतिनिधी शर्मिला पाटील यांची उपस्थिती होती.