Senior leader resigns before local elections : राज्य कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर नाराजी वाढली; कार्यकर्त्यांमध्येही असंतोष
Akola अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये राज्य कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर असंतोषाची लाट उसळली आहे. याचे पडसाद गुरुवारी स्पष्टपणे उमटले, जेव्हा काँग्रेसचे निष्ठावान पदाधिकारी आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
डॉ. पाटील यांनी गेल्या सात-आठ वर्षांपासून काँग्रेस विचारधारेचा स्वीकार करत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्य केले होते. संघ परिवारासारख्या विचारसरणीतून पुढे आलेले असूनही त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र पक्षातील अलीकडील घडामोडींमुळे त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Bad roads problem : विद्यार्थ्यांचा संयम सुटला अन् उतरले रस्त्यावर !
राज्य कार्यकारिणीत अनेक अशा व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे, जे पक्षाचे प्राथमिक सदस्यसुद्धा नाहीत किंवा जे पूर्वीच काँग्रेस सोडून गेले होते. दुसरीकडे, पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तालुका कार्यकारिणीतदेखील स्थान देण्यात आले नाही, ही खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांचे मनोबल खचत असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर युवा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर चढताना दिसत असून, थेट प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेकांनी काँग्रेस सोडल्याची पार्श्वभूमी पाहता, अकोल्यातही अशाच स्वरूपाची गळती वाढू शकते, अशी भीती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे.
राजीनाम्याबाबत विचारणा केली असता, डॉ. अभय पाटील यांनी “कौटुंबिक आणि व्यावसायिक कारणांमुळे पक्षाला आवश्यक वेळ देता येत नाही, म्हणून मी बाजूला होत आहे,” असे सांगितले. मात्र त्यांनी दिलेला राजीनामा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आणि चिंतेचा विषय ठरला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस तर्फे उमेदवारी देण्यात आलेल्या डॉ. पाटील यांचा केवळ ४१ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांनी पक्षात सक्रिय राहून काम सुरू ठेवले होते. अशा निष्ठावान कार्यकर्त्याचा पक्षातून बाहेर पडणे हे निश्चितच काँग्रेससाठी गंभीर इशारा मानला जात आहे.








