State Minister clarifies that the BJP–NCP alliance is confirmed : एक-दोन जागांचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे स्पष्ट
Akola अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती निश्चित होणार असल्याचा ठाम विश्वास राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीतील एक ते दोन जागांचा तिढा अद्याप शिल्लक असून, तोही लवकरच निकाली निघेल, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिका निवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती व्हावी, यासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने आपण अकोल्यात आलो असल्याचे राज्यमंत्री नाईक यांनी सांगितले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी युतीबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत अतिशय सकारात्मक चर्चा झाली असून, केवळ एक-दोन जागांचा प्रश्न प्रलंबित आहे. तोही लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल आणि महानगराध्यक्ष जयंत मसने यांच्यासोबत युतीबाबत प्राथमिक व सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली.
महानगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजयराव देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीला १५ जागांची मागणी केली होती. चर्चेनंतर १४ जागांवर एकमत झाले असून, त्या जागांवर भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, यावर भर दिला जाणार असल्याचे राज्यमंत्री नाईक यांनी स्पष्ट केले.
Amravati Municipal Election : अमरावतीत भाजप – शिवसेना युतीला तडा!
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवारांचे ‘एबी’ फॉर्म तयार असल्याची माहितीही राज्यमंत्री नाईक यांनी दिली. युतीच्या अधिकृत निर्णयानंतर तात्काळ उमेदवारांना ‘एबी’ फॉर्म देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती होणे जवळपास निश्चित झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.








