State general secretary of congress minority cell resigns : उमेदवारी नाकारल्याने काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या प्रदेश महासचिवांचा राजीनामा
Akola महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आल्याने काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेश महासचिव मो. जमीर शेख हनीफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपली आई अख्तर बी. शेख हनीफ यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. त्या माजी नगरसेविका आहेत. हा राजीनामा त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष हाजी वजाहत मिर्झा यांच्याकडे पत्राद्वारे सादर केला आहे.
मंगळवारी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणात घमासान झाले. उमेदवारी न मिळाल्याने संतप्त समर्थकांनी आमदारांचा फोटो असलेल्या फलकाला काळे फासून निषेध व्यक्त केला होता. प्रभाग क्रमांक १ मधून उमेदवारी नाकारल्याबाबत पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोपही झाले होते.
Amravati Municipal Corporation Election : कोण माघार घेणार, कोण पुढे जाणार; फैसला आज!
आता याच प्रभागातील आणखी एका माजी नगरसेविकेला उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी व त्यांच्या मुलाने थेट राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनामा पत्रात मो. जमीर शेख हनीफ यांनी नमूद केले आहे की, ते गेल्या सुमारे ३० वर्षांपासून काँग्रेस पक्षासाठी कार्यरत आहेत. २०१७ मध्ये त्यांच्या मातोश्री अख्तर बी. शेख हनीफ यांना काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक १ (नायगाव–अकोट फैल) येथून उमेदवारी देण्यात आली होती आणि त्या निवडूनही आल्या होत्या.
मात्र यंदा स्थानिक राजकीय दबावामुळे उमेदवारी नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ आपण काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या प्रदेश महासचिव पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.








