Akola Municipal Corporation : समित्यांवर वर्चस्व कुणाचे? सभापती पदांच्या निवडीसाठी २ मार्चला रणधुमाळी

Meeting-for-standing-committee-chairman-selection-on-March-2 : for the election of chairperson posts : स्थायी समितीसह महत्त्वाच्या समित्यांसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग; आजपासून अर्ज भरले जाणार

Akola अकोला महानगरपालिकेतील सत्तेचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीसह महिला व बालकल्याण आणि सर्व प्रभाग समिती सभापती पदांसाठी आता राजकीय हालचालींना उधाण आले आहे. आगामी २ मार्च २०२६ रोजी या पदांसाठी निवडणूक सभा होणार असून, अकोला मनपावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महापालिका आयुक्तांनी या निवडीसाठी विशेष सभा घेण्याची विनंती विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्याकडे केली होती. त्याला हिरवा कंदील मिळाला असून, त्यानुसार सोमवार, २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

BJP state body : भाजपने साधला विदर्भातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये बॅलन्स

या संपूर्ण प्रक्रियेवर जिल्हाधिकारी वर्षा मीना या पीठासीन अधिकारी म्हणून लक्ष ठेवणार असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडेल. स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती आणि सर्व प्रभाग समिती सभापतींच्या निवडी एकामागोमाग एक अनुक्रमे केल्या जाणार आहेत. राजकीय वर्तुळात या निवडीला विशेष महत्त्व आहे, कारण या समित्यांच्या माध्यमातूनच शहराच्या विकासकामांवर आणि तिजोरीवर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांकडून आपल्या समर्थकांना या पदांवर बसवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे.

Sudhir Mungantiwar : शेतकरी अडचणीत, मुनगंटीवार मैदानात, प्रति हेक्टर २० हजार धान बोनसची जोरदार मागणी!

निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून नामनिर्देशन पत्रांचे (अर्ज) वाटप आणि स्वीकारण्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांना बुधवार, २५ फेब्रुवारी आणि गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आपले अर्ज महानगरपालिका सचिव कार्यालयात सादर करता येतील. अर्जांच्या छाननीनंतर खऱ्या अर्थाने राजकीय चित्र स्पष्ट होणार असून, कुणाचे पारडे जड राहणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने या प्रक्रियेत राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले असले, तरी प्रत्यक्षात मात्र ही निवडणूक अकोल्याच्या स्थानिक राजकारणात मोठा संघर्ष निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.