Disciplined security during CM’s visit by Police : उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अकोला पोलिसांना रोख पुरस्कार
Akola मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (११ जून) CM Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (१२ जून) DCM Ajit Pawar यांच्या अकोला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेड प्लस सुरक्षेचा बंदोबस्त अकोला पोलिसांनी अत्यंत दक्षतेने आणि जबाबदारीने पार पाडला. दोन्ही दिवशी दौरे शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीत पार पडले. या दौऱ्यादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षकांनी रोख रक्कम देऊन पुरस्कृत केले.
या व्हीआयपी बंदोबस्तासाठी अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त योजना आखण्यात आल्या होत्या. वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था, गर्दीचे व्यवस्थापन, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको या बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले होते. काही संघटनांकडून निदर्शनांची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग अकोला यांच्या पथकांनी सकाळपासूनच कार्यवाही करून १९ प्रमुख कार्यकर्ते तसेच २५ ते ३० इतर पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम समाप्तीपर्यंत ताब्यात घेतले. या कारवाईत ग्रामीण पोलीस ठाण्यांचेही योगदान लाभले.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा पुढाकार अन् चंद्रपूर होणार Honey Hub!
वादळ, पावसाच्या प्रतिकूल हवामानातही पोलिसांनी आपली सेवा अखंडपणे बजावली. या उत्कृष्ट कार्यासाठी अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “संपूर्ण पोलीस दलाने दाखवलेली शिस्त, संयम व कार्यक्षमता ही आदर्शवत आहे. हे यश हा एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे.”
बंदोबस्तादरम्यान दोन इसमांनी मुख्यमंत्री महोदयांच्या कॅन्वॉय मार्गावर अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस अंमलदार पवन इंगोले, स्वप्नील वडतकर, सुरेंद्र शेजव, मयूर खडसे, रामेश्वर गिरी व अतुल साबळे यांनी त्वरित प्रतिक्रिया देऊन दोघांना ताब्यात घेतले. दुसरीकडे, व्हीआयपी कॅन्वॉय जात असतानाच रुग्णवाहिका मार्गावर असल्याने वाहतूक पोलीस दीपक पवार व हनुमंत बंडे यांनी प्रसंगावधान राखत तिला तात्काळ मार्ग मोकळा करून दिला.
या उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस अधीक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंमलदारांना प्रत्येकी ₹२५००चे रोख बक्षीस आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य केल्याने संपूर्ण दौरा यशस्वीरीत्या पार पडला, असे त्यांनी नमूद केले.