Akola Politics : अकोल्यात युतीत तणाव; शिंदे गटाकडून भाजपवर टीका

Internal conflicts in mahayuti in akola : अंतर्गत वाद चव्हाट्यावर, स्थानिक प्रश्नांवरून कोंडीत पकडण्याचे संकेत

Akola केंद्र, राज्य आणि महापालिकेत भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यक्रमातच भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात आले. एका कार्यक्रमात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर आरोप करत आगामी काळात नागरी प्रश्नांवरून कोंडीत पकडण्याचे संकेत दिले. यावर भाजपनेही प्रत्युत्तर देत युती धर्म पाळण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, या कार्यक्रमातून शिंदे गटातील अंतर्गत वादही उफाळून आला. जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते, असा आरोप समोर आला असून हा मुद्दा पक्षश्रेष्ठींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील चार नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. शनिवारी त्यांच्या सत्कार व प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर, चंद्रशेखर पांडे, विप्लव बाजोरिया, विठ्ठल सरप, उपजिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल, महिला जिल्हाध्यक्ष उषा विरक, रेखा राऊत, तसेच नगरसेवक सागर भारुका, मनोज पाटील, सोनाली सरोदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष अनासने यांनी केले.

Vijay Wadettiwar : खरात फाईलने अनेक बड्या मंत्र्यांची खुर्ची धोक्यात!

कार्यक्रमाला विलंब झाल्यामुळे जिल्हाप्रमुख अश्विन नवले हे मधेच निघून गेल्याचे सांगितले जाते. तर श्रीरंग पिंजरकर यांनी आपल्याला निमंत्रणच मिळाले नसल्याचे स्पष्ट केले. काही नेते केवळ श्रेय घेण्यासाठी आणि पक्षांतर्गत वाद निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सर्व बाबी मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीपासूनच भाजप आणि शिंदे गटात राजकीय रस्सीखेच सुरू आहे. जुन्या शहर भागात दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत झाली होती आणि दोन्ही बाजूंना फटका बसला होता. त्यातच विधानसभा निवडणुकीतील समीकरणांचा प्रभावही दिसून आला होता. आता ठाकरे गटातील नगरसेवकांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाचे मनपातील संख्याबळ वाढले असले तरी दोन्ही पक्षांतील अंतर्गत स्पर्धा कायम असल्याचे चित्र आहे.

Akola Zilla Parishad : दिव्यांग कोट्यात गैरव्यवहाराचा आरोप, लाभार्थ्यांना डावलले

दरम्यान, भाजपचे माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी प्रतिक्रिया देताना, “शिंदे गटाच्या टीकेकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहतो. मात्र वक्तव्य करताना संयम पाळावा आणि युती धर्म जपावा,” असे म्हटले.
शिंदे गटाचे महानगराध्यक्ष राजेश मिश्रा यांनी मात्र, “सत्तेत असतानाही आम्हाला संघर्ष करावा लागला. त्यामुळे आता नागरी प्रश्नांवर बोलताना भाजप नाराज होईल, असा विचार करणार नाही,” असे स्पष्ट केले. तसेच महापालिका सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’ नाव रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.