Political show in Ram Navami celebration : ४० वर्षांची परंपरा असलेली शोभायात्रा राजकीय उपस्थितीमुळे ठरली चर्चेचा विषय
Akola श्रीराम नवमीच्या निमित्ताने अकोल्यात काढण्यात आलेली शोभायात्रा केवळ धार्मिक उत्सव राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून ही शोभायात्रा राजकीय शक्तिप्रदर्शनाचे व्यासपीठ बनत चालली आहे. यंदाही शोभायात्रेत विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, इच्छुक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली. त्यामुळे या धार्मिक सोहळ्याचा राजकीय उपयोग होत असल्याची प्रचिती लोकांना आली.
१९८६ पासून सुरू झालेल्या या शोभायात्रेची सुरुवात विश्व हिंदू परिषदेच्या संकल्पनेतून झाली होती. अयोध्येतील रामजन्मभूमी आंदोलनाशी याचा थेट संबंध असल्याने या शोभायात्रेचा हिंदुत्वाशी असलेला संबंध राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. दिवंगत आमदार स्व. गोवर्धन शर्मा यांनी या परंपरेला अकोल्यात रुजवले आणि त्यानंतर ती एका भव्य महोत्सवाचे रूप धारण करत गेली.
Nitin Gadkari : कार्यालयाचं भाडं मागायला घरमालक संघ कार्यालयात गेले होते!
राजकीयदृष्ट्या पाहता, अकोल्यातील रामनवमीची शोभायात्रा ही हिंदू मतदारांमध्ये प्रभाव निर्माण करण्याचे माध्यम बनली आहे. यंदा भाजप, युवा स्वाभिमान पक्ष, काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट व ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, आमदार, माजी नगरसेवक आणि इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यकर्त्यांनी झेंडे, भगवे फेटे, जयघोष यामधून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, वसंत खंडेलवाल आदींसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोभायात्रेत सहभागी होऊन शक्ती प्रदर्शन केले.
रामनवमीसारखा धार्मिक उत्सव सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देतो. मात्र, सध्या त्याचा उपयोग प्रचारपूर्व राजकीय रणनितीसाठी होत असल्याचे चित्र दिसते. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, लोकांच्या भावना जोडण्यासाठी अशा उत्सवांमध्ये सक्रिय सहभाग घेणे ही राजकीय गरज बनली आहे.
शोभायात्रेतील देखाव्यांबरोबरच राजकीय उपस्थितीही लोकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. त्यामुळे अकोल्यातील रामनवमी शोभायात्रा ही केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता, राजकीय संदेशवहनाचे एक प्रभावी माध्यम ठरत आहे.
Nitin Gadkari : भाजपचे कार्यालय सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे केंद्र ठरेल !
आमदार साजिद खान पठाण यांनी केले स्वागत
आमदार साजीद खान पठान यांनी श्रीराम नवमी शोभायात्रेचे गांधीचौकात स्वागत केले. याप्रसंगी श्रीराम नवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवाधिकारी कृष्णा गोवर्धन शर्मा, समितीचे अध्यक्ष शैलेंद्र कागलीवाल, राहुल राठी, प्रकाश लोडिया, सिद्धार्थ शर्मा, दिलीप खतरी, मनोज खंडेलवाल, बबनराव चौधरी, प्रकाश तायडे, आकाश कवडे व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.








