SIT-formed-for-akot-apmc-irregularities : अकोट बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी ‘एसआयटी’; ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
Akola अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी राज्य शासनाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून, चौकशीत शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
खरेदी संस्थांनी किंवा संबंधित व्यक्तींनी कापूस व ज्वारी खरेदी प्रक्रियेत अनियमितता केली आहे का, संगनमताने गैरव्यवहार झाले आहेत का, तसेच शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांमध्ये हेतुपुरस्सर फेरफार करून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे का, याची सखोल चौकशी करण्यासाठी हे विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे.
Iran israel war : इराण-इस्रायल संघर्षाची भारताला आर्थिक झळ; महागाई वाढण्याची मोठी भीती !
एसआयटीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे येथील अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला हे सदस्य आणि जिल्हा विशेष लेखापाल अधिकारी (वर्ग-१), अमरावती हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत राहणार आहेत.
विनायक सरनाईक आणि गजानन पुंडकार यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जांवर क्षेत्रीय कार्यालयाने केलेल्या कारवाईचीही तपासणी केली जाणार आहे. हंगाम २०२४-२५ मध्ये नरसिंग महाराज प्रोड्युसर कंपनी, अकोट तसेच खरेदी-विक्री सहकारी संस्था, अकोट यांनी ज्वारी खरेदीदरम्यान शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यात फेरफार केला आहे का, याचीही चौकशी होणार आहे. फेरफार सिद्ध झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट यांचे विभाजन करून नवीन लघु बाजार समिती स्थापन करण्यासंदर्भातील बाबींचीही तपासणी करण्यात येणार आहे. या तपास पथकाला ९० दिवसांच्या आत शासनाकडे अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव माधवी शिंदे यांनी जारी केला आहे.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान अकोट बाजार समितीतील चौकशी प्रकरणे निश्चित कालावधीत पूर्ण केली जातील, असे आश्वासन पणन मंत्र्यांनी दिले होते. तसेच नरसिंग महाराज प्रोड्युसर कंपनी आणि खरेदी-विक्री सहकारी संस्था, अकोट यांनी ज्वारी खरेदी प्रक्रियेत अनियमितता केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते.
Sudhir mungantiwar : स्थानिकांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही, मुनगंटीवारांचा वेकोली प्रशासनाला दम
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीबाबत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांच्याकडून सुरू असलेल्या चौकशीला झालेला विलंब, तसेच सातबारा उताऱ्यांमध्ये हेतुपुरस्सर फेरफार करून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही आश्वासन देण्यात आले होते. त्या अनुषंगानेच एसआयटीची नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.








