Indicative offer from Shinde group, big statement by Naresh Mhaske : शिंदे गटाकडून सूचक ऑफर, नरेश म्हस्के यांचे मोठे वक्तव्य
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा रस्सीखेच रंगताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुरक्षित राजकीय घर शोधत असल्याचं धक्कादायक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. दानवे योग्य निर्णय घेण्याचा विचार करत आहेत आणि त्यांना आम्ही आमंत्रण देतो, असे सूचक विधान करून म्हस्केंनी मोठी चर्चा पेटवली आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, “अंबादास दानवे सुरक्षित घर शोधत असतील, तर त्यांनी ते सुरक्षित घर स्वीकारावंच. आम्ही त्यांना आमंत्रण देतो. तेही योग्य विचार करत आहेत.” या एका वक्तव्याने ठाकरे गटात हलचल निर्माण झाली असून दानवे शिंदे गटात जाणार का, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Local body election : शिंदे गटातील आमदार, खासदारांचा मोठा निर्णय !
महायुतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ सुरू असल्याचा दावा करत म्हस्के म्हणाले की, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस सोडून इतर सर्वजण महायुतीमध्ये सामील होत आहेत. अशा परिस्थितीत दानवे यांच्यासाठी शिंदे गटाची ऑफर महत्वाची मानली जात आहे. मात्र ते निर्णय घेतील का, याकडे राज्याचे लक्ष आहे.
काँग्रेसच्या दिशाहीन धोरणामुळे उद्धव ठाकरेंचा राजकीय कडेलोट झाला असल्याचं कठोर विधानही नरेश म्हस्के यांनी केले. राहुल गांधींनी निवडणूक आयोगासमोर कोणताही पुरावा सादर केला नसल्याने विरोधक उगाच आरोप करत असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीबाबत बोलताना म्हस्के म्हणाले की, “महाराष्ट्रात महायुती 100 टक्के आहे. ज्या ठिकाणी एकमत होणार नाही, त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू आणि नंतर पुन्हा एकत्र येऊ. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि महायुती पुन्हा सत्तेत येणार याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”








