Breaking

Amgaon Municipal Council : दोन चिमुरड्यांसह आईचं न्यायासाठी आमरण उपोषण

Mother with two daughters on hunger strike : आमगाव नगरपरिषदेपुढे कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचा आक्रोश

Gondia Amgaon “न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, जीव गेला तरी चालेल!” – असं म्हणत दोन अल्पवयीन मुलींना घेऊन दुर्गा कटरे या कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने आमगाव नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. चिमुरड्या मुलींच्या डोळ्यातली आशा, आईच्या चेहऱ्यावरील संघर्षाची जाणीव, आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेली ही हृदयद्रावक परिस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

दुर्गा कटरे या महिलेस ३० सप्टेंबर २०२१ रोजी नगरपरिषद कार्यालयात कंत्राटी तत्त्वावर कार्यालयीन कामासाठी नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना कामावरून कमी करण्यात आलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचं काम चोख सुरू असतानाही अचानक नोकरी हिरावून घेण्यात आली. घर नसल्यामुळे तसेच दोन लहान मुलींचा सांभाळ एकटीने करत असलेल्या या महिलेसमोर आता उदरनिर्वाहाचं मोठं संकट उभं राहिलं आहे.

Vidarbha Farmers : रक्त दिलं, आता तरी सातबारा कोरा करा !

न्यायासाठी प्रशासनाचे दरवाजे झिडकारल्यावर अखेर त्यांनी आपल्या दोन चिमुकल्या मुलींना घेऊन नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. कडक उन्हात, कोणत्याही छायेखाली न बसता, कोणत्याही सुविधा न घेता ही महिला आपल्या न्यायासाठी झगडतेय. त्यांची चिमुरडी बहिणीला पाणी देताना डोळ्यातून वाहणारे अश्रू, आईला घट्ट पकडलेला हात – या दृश्यांनी अनेकांचे मन हेलावून टाकले आहे.

NMRDA : मुख्यमंत्र्यांनी सांगितले, कसे असेल नवीन नागपूर !

दुर्गा कटरे सांगतात, “माझ्याकडे हक्काचं घर नाही, दुसरी नोकरी मिळत नाही, माझ्या मुलींच्या भवितव्याचा प्रश्न आहे… म्हणूनच न्याय मिळेपर्यंत इथून उठणार नाही.” दुसरीकडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सांगतात की, “दुर्गा कटरे यांची नेमणूक ही कंत्राटी होती. त्यांच्या कामाबाबत काही त्रुटी होत्या, त्यामुळेच त्यांना कामावरून कमी करण्यात आलं.”

मात्र अशा अजब कारणांवरून घरातील एकमेव आधारस्तंभ असलेल्या महिलेवर उपोषणाची वेळ यावी, हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व काही राजकीय मंडळींनीही या घटनेकडे लक्ष दिलं असून लवकरात लवकर दुर्गा कटरे यांना न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.