Merging of NCPs impossible without conditions : राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यावर आमदाराची स्पष्ट भूमिका, अटीशर्तीशिवाय एकी नाही
Akola राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. पण या चर्चा निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नाही, असे स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.
“जर एकत्र येण्याचा विचार असेल, तर आमच्याकडून काही स्पष्ट अटीशर्ती असतील. दादांवर (अजित पवार) पातळी सोडून टीका करणाऱ्यांनी आधी माफी मागावी,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
‘बातम्यांचा आधार फक्त अफवा’
राज्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत अशा कोणत्याही प्रकारचा एकीचा विषयच चर्चेत नव्हता, असे मिटकरी यांनी स्पष्ट केले. “मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित होतो. अजित पवारांनी अशा प्रकारचे कोणतेही विधान केले नाही. सूत्रांचा दाखला देऊन पेरल्या गेलेल्या बातम्या धादांत खोट्या आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
Amol Mitkari : ‘‘मलाच नाही मिळालं, मग शेतकऱ्यांचे काय होणार?’’
‘एकत्र येणारच असू, तर नेतृत्व अजित पवारांचेच हवे’
मिटकरी म्हणाले, “शरद पवार हे मार्गदर्शक आहेत; मात्र दोन्ही गट एकत्र येणार असतील, तर ते फक्त अजित पवार यांच्या नेतृत्वातच शक्य आहे.”
शरद पवार गटात महत्त्वाची बैठक
दरम्यान, शरद पवार गटाची आज (बुधवार) महत्त्वाची बैठक होत असून, त्यात दोन्ही गटांच्या संभाव्य एकीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याआधी शरद पवारांनी एकीकरणाचा निर्णय सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवला होता. सुळे यांनी निर्णय घेण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.
महाविकास आघाडीची हालचाल?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार सचिन अहिर व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी शरद पवारांची भेट घेतल्याने, महाविकास आघाडीच्या पुढील रणनीतीबाबतही चर्चांना ऊत आला आहे.