MLA Advises Vijay Wadettiwar and Rohit Pawar to Get Their Brains Checked : चंद्रकांत पाटलांवरही पलटवार; आघाडीचा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा
Akola अजित पवार यांच्या कर्जमाफीसंदर्भातील वक्तव्यावरून टीका करणाऱ्या नेत्यांना अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी चांगलच सुनावलं. “अजितदादा बारामतीत आपल्या परिवाराशी जसं बोलले तसेच ते जनतेशी बोलले. पण काही ‘अक्कल नसलेले’ लोक यावर ट्वीट करत आहेत. त्यामुळे विजय वडेट्टीवार आणि रोहित पवार यांनी एकदा आपल्या मेंदूची तपासणी करून घ्यावी,” असा बोचरा सल्ला अमोल मिटकरींनी दिला.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘राष्ट्रवादी ही शरद पवारांची आहे,’ असे विधान केले होते. त्याचाही मिटकरी यांनी समाचार घेतला. “चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीचे आहेत की महायुतीचे, हेच समजत नाही,” अशी खोचक टीका करत “वाढत्या वयामुळे त्यांच्याकडून अशी वक्तव्ये होत असावीत,” असाही चिमटा मिटकरींनी काढला.
Election Commission : मतदार ओळखपत्र देण्यात हलगर्जीपणा, दिवाळीचे कारण
चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे झालेल्या कार्यक्रमात “राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवारांचा आणि शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे” असं विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना एकत्र ठेवून केलेल्या या विधानामुळे भाजपच्या मित्रपक्षांतही अस्वस्थता निर्माण झाली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी म्हणाले, “चंद्रकांतदादांची ‘स्लीप ऑफ टंग’ झाली असावी. पण ते सध्या महाविकास आघाडीत आहेत की महायुतीत, हेच स्पष्ट नाही. खरी राष्ट्रवादी आणि खरी शिवसेना कोणाची आहे, याचा कौल महाराष्ट्रातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत दिला आहे.”
मुंबईत आज झालेल्या महाविकास आघाडी आणि मनसेच्या ‘सत्याच्या मोर्चा’वरही मिटकरींनी टीकेची झोड उठवली. “आजचा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा आहे. ही हौशा-गौश्या-नवशांची यात्रा आहे,” असा चिमटा त्यांनी काढला. महायुती भक्कमपणे काम करत असल्यानेच महाविकास आघाडी आणि मनसे असे मोर्चे काढत आहेत, असा टोमणाही मिटकरींनी लगावला.








