Party workers express anger over MLA Mitkari’s working style : अजित पवारांना भेटून तक्रार करणार, तीव्र असंतोष उफाळला
Akola राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, बार्शिटाकळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे विधान परिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्या उर्मट वागणूक व कार्यशैलीमुळे अस्वस्थ झाले असून, असंतोषाची भावना तीव्र झाली आहे.
शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आ. मिटकरी यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
Adv. Prakash Ambedkar : सत्तेत असताना सातबारा कोरा का केला नाही?
बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, आ. मिटकरी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना आमंत्रित करत नाहीत. त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला तर ते फोन घेत नाहीत. प्रत्यक्ष भेटीसाठी गेल्यास तासन्तास वाट पाहायला लावतात आणि नंतर भेट घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येते. अशी वागणूक पक्ष संघटनेसाठी अपायकारक असून, जनतेची कामे व विकासात्मक उपक्रमही अडथळ्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली. परिणामी, पक्षाचा विस्तार होण्याऐवजी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दसऱ्यानंतर भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनोद थुटे, बार्शिटाकळी पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन म्हैसने, बाजार समितीचे संचालक व माजी तालुकाध्यक्ष महादेव साबे, माजी तालुकाध्यक्ष वसंत जाधव, खरेदी-विक्री संस्थेचे संचालक व सरपंच सुनील ढाकोलकार, माजी सभापती प्रल्हाद खुळे, सोसायटी अध्यक्ष गोपाल मांगुळकर यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
Local Body Elections : गण-गटांच्या आरक्षणाला १३ ऑक्टोबरचा मुहूर्त
दरम्यान, या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आमदार अमोल मिटकरी उपलब्ध झाले नाहीत. तथापि, त्यांच्या कार्यशैलीविरोधात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आला असून, ते लवकरच अजित पवारांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.