Congress Nagar has become a centre of legends : देशाला लाभले राष्ट्रपती ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
Amravati विदर्भाची सांस्कृतिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेलं अमरावती शहर देशाच्या राजकारणातही महत्त्वाचं केंद्र ठरत आहे. याच शहरातील काँग्रेस नगर परिसर अनेक नामवंत राजकीय आणि न्यायक्षेत्रातील व्यक्तींचं निवासस्थान ठरले आहे.
या परिसरातील विशेष बाब म्हणजे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे वास्तव्य या परिसरात आहे. त्यांच्या घराजवळच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांचेही निवासस्थान आहे. पुढे अवघ्या दहाव्या घरावर केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल रा. सू. गवई यांचेही घर आहे. विशेष म्हणजे, देशाचे भावी ५२वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हेदेखील काँग्रेस नगरचे रहिवासी आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तींमुळे काँग्रेस नगर आता अमरावतीचं भूषण म्हणून ओळखलं जातं आहे.
प्रतिभा पाटील यांनी 1967 ते 1985 दरम्यान मुक्ताईनगर (जळगाव) मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 1985 मध्ये त्या राज्यसभेवर निवडून गेल्या आणि 1991 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या. त्यांच्या या विजयानंतर काँग्रेस नगर चर्चेचा विषय ठरला. त्यानंतरच्या काळातही या परिसरात अनेक घडामोडी घडल्या ज्यामुळे काँग्रेस नगर सातत्याने चर्चेत राहिलं.
Justice Bhushan Gawai : अमरावतीचे सुपूत्र ठरणार ५२वे सरन्यायाधीश!
अमरावती महापालिकेची स्थापना 1983 मध्ये झाली, तर पहिली निवडणूक 1992 मध्ये झाली. यामध्ये प्रतिभाताईंचे पती, प्रा. डॉ. देवीसिंह शेखावत, हे अमरावतीचे पहिले महापौर म्हणून निवडून आले. 2009 मध्ये त्यांच्या पुत्र रावसाहेब शेखावत अमरावती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले.
काँग्रेस नगरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)चे नेते रा. सू. गवई यांचेही घर आहे. त्यामुळे हा परिसर रिपब्लिकन विचारांचं केंद्र मानला जातो. रा. सू. गवई हे 1964 ते 1994 या कालावधीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे सलग 30 वर्ष सदस्य होते. 1998 मध्ये लोकसभा सदस्य, तर 2000 ते 2006 दरम्यान राज्यसभा सदस्य होते. नंतर ते सिक्कीम, बिहार आणि केरळ राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. त्यांचे पुत्र भूषण गवई हे आता सर्वोच्च न्यायालयाचे भवानी न्यायाधीश होणार आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे (कार्यकाळ: 28 मार्च 1991 ते 15 जुलै 1999) हेही काँग्रेस नगरचेच रहिवासी आहेत. प्रतिभा पाटील व रा. सू. गवई यांच्या घरांजवळच त्यांचंही घर आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाशी संलग्न आहेत.