Advice to party workers to focus on wards : निवडणुकांसाठी कामाला लागण्याच्या सूचना; मंडळ अध्यक्षांची बैठक
Amravati आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी कंबर कसली आहे. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच जिल्हाभरातील मंडळ अध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपला प्रभाग निवडणुकीचा किल्ला समजून कामाला लागावे, अशा सूचना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या.
या बैठकीस माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, खासदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, एडीसीसीचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे, सेवादल अध्यक्ष प्रदीपराव देशमुख, जिल्हा संघटक गिरीश कराळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Akola Shiv Sena : चिखलगाव सर्कलमधील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश
बैठकीत बोलताना बबलू देशमुख म्हणाले, “निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने आपला मंडळ हाच निवडणुकीचा किल्ला समजावा. जिथे आपण काम करतो त्या प्रभागातील नागरिकांशी संपर्क वाढवा, त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि त्या सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाची ताकद उपयोगात आणा. ‘मंडळ मजबूत तर मत मजबूत’ हे लक्षात ठेवून काम करा.”
काँग्रेसची विचारधारा ही लोकशाही आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारी आहे. ती प्रत्येक गाव, वॉर्ड आणि प्रभागापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे दायित्व मंडळ अध्यक्षांवर आहे, असेही ते म्हणाले.
बैठकीदरम्यान मंडळनिहाय नियोजन, मतदार यादीतील सुधारणा, युवकांमध्ये जनजागृती, महिलांचा सहभाग वाढविणे, तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर यावर सविस्तर चर्चा झाली. स्थानिक स्तरावर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर सर्वानुमते भर देण्यात आला.
या बैठकीला जिल्हा व तालुका काँग्रेस पदाधिकारी, शहर व ग्रामीण मंडळ अध्यक्ष उपस्थित होते. यामध्ये प्रमोद दाळू, श्रीकांत बोंडे, निशांत जाधव, नामदेव तनपुरे, सहदेव बेलकर, महेंद्र गैलवार, दीपक सवाई, समीर पाटील, प्रवीण सवाई, शरद भेटाळू, राहुल बोडके आदींचा समावेश होता.