Breaking

Amrut Bharat Scheme : मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा कायापालट

Transformation of Murtijapur railway station : ‘अमृत भारत’ योजनेतून नव्या सुविधांचा लोकार्पण सोहळा

Akola रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांच्या विकासानंतर आता रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर घालण्यात येत आहे. येणाऱ्या काळात रेल्वेच्या विकासातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू, असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला. मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकसित सुविधांच्या लोकार्पण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या वेळी आमदार हरीश पिंपळे, भुसावळ रेल्वे विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) मुकेशकुमार मीना, आर.के. यादव, गौतम मिसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार पिंपळे यांनी आपल्या भाषणात, “येणाऱ्या काळात मूर्तिजापूर स्थानकावर आणखी रेल्वे गाड्यांचे थांबे वाढतील,” असा विश्वास व्यक्त केला.

Kharif season : खरीप हंगाम डोक्यावर, कर्जवाटप फक्त १० टक्के

मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा समावेश ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील १०३ नव्याने विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ मे २०२५ रोजी करण्यात आले. हे प्रकल्प १८ राज्यांतील ८६ जिल्ह्यांत १,१०० कोटींपेक्षा अधिक खर्चून पूर्ण करण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत मूर्तिजापूर स्थानकावर भव्य प्रवेशद्वार, आकर्षक दर्शनी भाग, अत्याधुनिक प्रतीक्षालये, स्वच्छतागृहे, दिव्यांग सुलभ रॅम्प्स, हायमास्ट लाईट्स, अद्ययावत तिकीट काउंटर, कोच इंडिकेशन सिस्टिम, प्लॅटफॉर्म कव्हर शेड आणि डिजिटल डिस्प्ले बोर्ड यासारख्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

E-bike taxi permission : ई-बाईक टॅक्सीच्या विरोधात ऑटोचालकांचा एल्गार!

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली देशभरात रेल्वेचे रूप झपाट्याने बदलत आहे. ‘विकसित भारत २०४७’च्या संकल्पाच्या दिशेने वाटचाल करत असताना भारतीय रेल्वेचा कायापालट ‘अमृत भारत स्टेशन योजना’तून होत आहे,” असे आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले.