व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Anganwadi workers : तीन महिन्यांपासून केंद्राचा निधी थकीत; दीड लाख सेविका-मदतनीसांमध्ये संताप

Anganwadi workers : तीन महिन्यांपासून केंद्राचा निधी थकीत; दीड लाख सेविका-मदतनीसांमध्ये संताप

Central funds pending for three months; anger among 1.5 lakh anganwadi workers and helpers : कामाचा वाढता बोजा, मानधनाचा खोळंबा; महिला कर्मचाऱ्यांचा सरकारला थेट सवाल

Buldhana बालकांचे संगोपन, पोषण आहार, आरोग्य तपासणी आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी अशी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून रखडल्याने केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. केंद्र सरकारचा हिस्सा वेळेवर न मिळाल्याने राज्यातील सुमारे दीड लाख सेविका-मदतनीसांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून हा प्रश्न आता राजकीय पातळीवरही गाजण्याची चिन्हे आहेत.

सध्या अंगणवाडी सेविकांना दरमहा सुमारे १३ हजार रुपये, तर मदतनिसांना ७,५०० रुपये मानधन दिले जाते. यातील सेविकांच्या मानधनात केंद्राचा ४,५०० रुपये, तर मदतनिसांच्या मानधनात ३,५०० रुपयांचा वाटा आहे. राज्य सरकारचा हिस्सा नियमित मिळत असला तरी केंद्राचा निधी सलग तीन महिन्यांपासून प्रलंबित असल्याने महिला कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

Harshwardhan Sapkal : नांगरावरून राजकारण तापले; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मात्र तोडगा नाहीच

घरखर्च, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन गरजा भागवताना सेविका-मदतनीसांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात शासनाच्या अनेक योजनांचा चेहरा म्हणून काम करणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांचेच मानधन रखडल्याने प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे.

मानधनाचे वितरण ‘स्पर्श’ प्रणालीद्वारे केले जात असताना तांत्रिक अडचणींमुळे निधी वितरणात विलंब होत असल्याची चर्चा आहे. मात्र, या तांत्रिक कारणांमुळे तीन महिन्यांचा निधी थांबणे म्हणजे प्रशासनातील निष्काळजीपणाच असल्याची टीका होत आहे.बुलढाणा जिल्ह्यात सुमारे साडेपाच हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. बालकांचे पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या योजना यांच्यामार्फत राबवल्या जात असल्याने निधीतील हा विलंब थेट तळागाळातील यंत्रणेवर परिणाम करणारा ठरत आहे.

Ready reckoner rate : बुलढाण्यात मालमत्ता व्यवहारांना वेग, महसूल वाढीवर प्रश्न!

महिला आणि बालकल्याणाशी संबंधित संवेदनशील विषय असल्याने विरोधकांकडून या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्राचा निधी थकीत असताना राज्य सरकारने प्रभावी पाठपुरावा का केला नाही, असा सवाल सेविका आणि त्यांच्या संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.“आधीच कामांचा डोंगर, त्यात मानधनाचा खोळंबा… अशा परिस्थितीत घरखर्च आणि जबाबदाऱ्या कशा पेलायच्या?” असा थेट सवाल अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांकडून उपस्थित होत आहे.

error: Content is protected !!