Anil Bonde Vs Navneet Rana : बावनकुळेंच्या उपस्थितीत अनिल बोंडे–नवनीत राणांमध्ये खडाजंगी

Heated clash among leaders in the presence of Chandrashekhar Bawankule : अमरावतीत चालयय काय?, एकमेकांची राजकीय निष्ठा काढली

Amravati अमरावतीत महायुतीत अंतर्गत बिघाडीचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. काही प्रभागांत नवनीत राणा भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय असताना, काही ठिकाणी राणा दाम्पत्य भाजप उमेदवारांच्या विरोधातच आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित भाजपच्या प्रचार सभेत खासदार अनिल बोंडे आणि नवनीत राणा यांच्यात जाहीर व्यासपीठावरच जोरदार वाद झाला. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेच्या संदर्भातून सुरू झालेला हा शाब्दिक संघर्ष थेट एकमेकांच्या राजकीय निष्ठेपर्यंत जाऊन पोहोचला.

अमरावती महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच राजकारणातील अंतर्गत तणावही उघड झाला आहे. नवनीत राणा एकीकडे भाजप उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होत आहेत, तर दुसरीकडे आपल्या पतीच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांसाठीही स्वतंत्र सभा घेत आहेत. याच मुद्द्यावरून भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रचार सभेत नवनीत राणा यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. त्यानंतर नवनीत राणा यांनीही आक्रमक पलटवार केला.

Uddhav Balasaheb Thackeray : भाजप मराठी माणसांना हिंदू मानत नाही

सभेत बोलताना खासदार अनिल बोंडे यांनी सुरुवातीला काँग्रेस आणि एमआयएमवर जोरदार टीका केली. “महापौर हिंदूच झाला पाहिजे,” असे ठामपणे सांगत त्यांनी थेट नवनीत राणांकडे मोर्चा वळवला. “कोण काय बोलतंय याकडे लक्ष देऊ नका, फक्त कमळासाठी मते मागा. एकदा भगवा खांद्यावर घेतला की जुने सगळे विसरून जा. माझा सख्खा भाऊ जरी युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडून उभा असता, तरी मी माझ्या भगव्याशी — म्हणजेच भाजपशी — प्रामाणिक राहिलो असतो,” असा थेट टोला बोंडे यांनी लगावला.

अनिल बोंडे यांच्या वक्तव्यानंतर नवनीत राणा यांनी भरसभेतच आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिले. “बोंडे भाऊ, मी मोर्शी फिरून आले आहे आणि तिथे माझी सभाही झाली आहे. मला कोणालाही सांगण्याची गरज नाही. जो भगव्याशी आणि भाजपशी बेईमानी करेल, त्यांच्या पाठीशी नवनीत राणा कधीच उभी राहणार नाही,” असे त्या म्हणाल्या.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा उल्लेख करत त्यांनी बोंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “लोकसभेच्या वेळी काही लोक म्हणाले होते, ‘अमरावतीची एक जागा हरलो तर काय फरक पडतो?’ त्याच वेळी ज्यांनी कमळाविरोधात काम केले, त्यांना आज भीती वाटणारच. बेईमानांना आम्ही सोडणार नाही,” असा तीव्र टोला नवनीत राणा यांनी लगावला.

Amravati Municipal Election : ‘कमळापेक्षा कोणीही मोठा नाही; युवा स्वाभिमानशी भाजपचा काडीमोड!’

विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीतच घडला. पक्षातील दोन प्रमुख नेत्यांमधील हा जाहीर वाद पाहून सभेला उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि मतदारही अचंबित झाले. या घटनेमुळे अमरावतीत भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि नवनीत राणा यांच्याविरोधातील एक गट पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.