Advice to workers not to fear BJP : माजी गृहमंत्री कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘भाजपला घाबरू नका’
Nagpur केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. याचा अर्थ नागपूर महानगरपालिकेतही येईल असे नाही. हाच विचार डोक्यात ठेवून निवडणुकीच्या तयारीला लागा, असा मंत्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाकडून मनपा निवडणूकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पक्षाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. भाजपविरोधातील जनतेच्या मनात असलेल्या रोषाचा फायदा उचला व जनतेत जास्तीत जास्त प्रमाणात जा असा सल्ला त्यांनी दिला.
पक्षाची बैठक रवी भवन सभागृहात झाली. बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, निरीक्षक मुनाज शेख, माजी आ. दीनानाथ पडोळे, किशोर गजभिये, माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य आदी उपस्थित होते.
Local Body Elections : सर्कल रचनेसाठी राजकीय पक्षांत रस्सीखेच
महापालिकेत गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. या १५ वर्षांत नागपूर शहराचे काय झाले आहे, हे जनतेला चांगले ठाऊक आहे. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे म्हणजे नागपूर महापालिकेतही येईलच असे नाही. भाजपला घाबरू नका. जनतेच्या मनात भाजपवर रोष आहे. या रोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी जनतेत जा, त्यांचे प्रश्न सोडवा, अशा शब्दांत नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
MLA Siddharth Kharat : बुलढाण्यात महाविकास आघाडीचाच डंका, आमदाराला विश्वास
मोहल्ला, वस्तीत बैठका सुरू करा. महागाई, बेरोजगारी, स्थानिक प्रश्न, कचरा, पाणीपुरवठा, मालमत्ता कर आदी प्रश्न जनतेसमोर मांडा. त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत याची जाणीव करून द्या, लोकांचा विश्वास जिंका. आपण ताकदीने निवडणूक लढू. तुम्ही तयारी सुरू करा, असे देशमुख यावेळी म्हणाले. काँग्रेसशी आघाडी करण्याबाबत बैठकीत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. भाजपशी लढायचे असेल तर काँग्रेस व राष्ट्रवादीला एकत्रित लढावे लागेल, असा विचार पदाधिकाऱ्यांनी मांडला. ज्येष्ठ नेत्यांनीही त्याला संमती दर्शविली.