Jayant Patil will remain the state president until the local body elections : कुणावर जबाबदारी द्यायची, हे शरद पवार ठरवतील
Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. परवा परवा झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमात त्यांनी या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षाच्या शिर्षस्थ नेत्यांना केली आहे. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष कोण, हा प्रश्न साहजिकच चर्चीला जात आहे. अशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जयंत पाटील यांच्याच नेतृत्वात लढल्या जातील, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात अनिल देशमुख यांनी आज (ता. १३ जून) माध्यमांना सांगितले की, जयंत पाटील यांनी स्वतः प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत तेच प्रदेशाध्यक्ष असतील, याची शक्यता अधिक आहे. नवीन चेहरा प्रदेशाध्यक्षपदी देण्याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार बोलले असले तरी सध्याच तो निर्यय होईल, असे वाटत नाही. पण यासंदर्भातला निर्णय शरद पवारच घेतील.
गुजरातमधील अहमीदाबाद विमानतळावर झालेल्या विमानाच्या अपघातात २००च्या वर मृत्यूमुखी पडले. यातील काही प्रवासी डॉक्टर होते. अपघात झाल्यावर चौकशी होतेच, याही प्रकरणात होईल. पण ब्लॅक बॉक्स उघडल्यावर नेमकं काय घडलं ते समोर येईल. जी विमानं लांब पल्ल्यांसाठी वापरली जातात आणि ज्यांना याचं ज्ञान आहे, तेच तांत्रिक बाबींतील उत्तर देऊ शकतील, असे देशमुख विमान अपघातावर बोलताना म्हणाले. आपल्या देशात यापूर्वीही काही विमान अपघात झाले आहेत. पण हा अपघात फार मोठा आणि गंभीर आहे, असेही त्यांनी सांगितले.
Ahmedabad plane crash : अपघात मेंटेनन्स अभावी की पायलट एरर !
शिक्षण घोटाळ्यासंदर्भात बोलताना देशमुख म्हणाले, या घोटाळ्यात दलाल सक्रीय होते. दलालांची चौकशी केल्यास सर्व सत्य बाहेर येईल. काही दलालांची नावे काटोल भागातून आली आहेत. यासंदर्भात पोलिस विभागाला माहिती दिली आहे. शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागाचेही काही अधिकारी यात गुरफटलेले आहेत. पात्रता नसताना अनेकांना नोकऱ्या मिळाल्या, पगार मिळत आहेत. पण शाळा कुठे आहेत, हे माहिती नाही. जळगाव, नाशिकपर्यंत या घोटाळ्याची व्याप्ती आहे. सर्व जिल्ह्यांची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.








