NCP chief Sharad Pawar will inaugurate the Kamandal Yatra : मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य होते
Nagpur : मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला सुरूवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. मात्र त्यावेळी भाजपने कमंडल यात्रा काढून विरोध केला होता. ओबीसी समाजासाठी शरद पवार यांनी निर्णय घेतला होता, त्याला भाजपने विरोध केला. ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ९ ऑगस्टपासून कमंडल यात्रा सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या यात्रेचे उद्घाटन करणार आहेत, अशी माहिती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अनिल देशमुख यांनी आज (७ ऑगस्ट) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले. शरद पवारांनी ओबीसींसाठी जे कामे केले, त्याचा १९९३ नंतर लोकांना विसर पडला. त्यामुळे ही माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडल यात्रा राज्यभरात जाणार आहे. यावेळी देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर टिका केली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी फडणविसांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे सांगितले होते. मात्र नऊ महिने उलटून गेले तरीही शेतकरी कर्जमाफीचा विषय अजूनही घेतलेला नाही. गेल्या काही महिन्यांत बऱ्याच शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतीमालाचे भाव पडले. पण त्याचीही दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही, असे देशमुख म्हणाले.
लाडक्या बहीणींना २१०० रुपये देण्याचे वचन दिले. पण बिचाऱ्या बहीणी अजूनही वाटत बघत आहेत. अशात २६ लाख बहीणी बाद झाल्या अन् अचानक १४ हजार पुरूष पुढे आले. इकडे कंत्राटदारांचे पैसे दिले नाहीत, त्यामुळे तेही शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करत आहेत. स्मार्ट मिटर जबरदस्तीने लावले जात आहे. दुसरीकडे लिकिंगचा प्रश्न गंभीर होच चालला आहे. असे प्रत्येक जिल्ह्यांतील प्रश्न आम्ही मांडणार आहोत, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.