Breaking

Anti Corruption Bureau : सातबाऱ्यावरून नाव कमी करण्यासाठी मागितले ८०० रुपये

Female Talathi caught red-handed while taking bribe : महिला तलाठ्याला पकडले रंगेहाथ; सडक अर्जुनी येथील कारवाईने खळबळ

Gondia सरकारी कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी एक यशस्वी कारवाई केली आहे. चिखली (ता. सडक अर्जुनी) येथील तलाठी कार्यालयात वारस फेरफार नोंदणीसाठी तब्बल ८०० रुपयांची लाच घेताना महिला तलाठी अश्विनी ठोंबरे व त्यांच्यासह कार्यरत खासगी इसम ओंकार शेंडे या दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

तक्रारदाराच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांना सातबाऱ्यावरून नाव कमी करून वारस फेरफार नोंद घ्यायची होती. यासाठी त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह रीतसर अर्ज सादर केला होता. मात्र तलाठी ठोंबरे यांनी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी थेट १ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम ८०० रुपयांवर आली. परंतु लाच देण्याची तक्रारदाराची मुळीच तयारी नसल्याने त्यांनी नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

Local Body Elections : अकोल्यात ‘थर्ड फ्रंट’चा नारा, नव्या समीकरणाची चर्चा

प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपासणीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक पथक तयार करण्यात आले. पडताळणी दरम्यान तलाठी ठोंबरे यांनी लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार गुरुवारी (दि. ८) दुपारी २:३० वाजता सापळा लावण्यात आला. तक्रारदार ठरल्याप्रमाणे रक्कम घेऊन तलाठी कार्यालयात गेले असता, तलाठी ठोंबरे यांनी ती रक्कम थेट न घेता कार्यालयात कार्यरत खासगी इसम ओंकार शेंडे यांच्या मार्फत स्वीकारली.

रक्कम हाती येताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई करत दोघांनाही रंगेहात पकडले. त्यानंतर तलाठी अश्विनी ठोंबरे व ओंकार शेंडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, वृत्त लिहेपर्यंत डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Uday Samant : टेक्सटाईल उद्योजकांसाठी खुशखबर; एक वर्षासाठी जमिनीचे दर कमी

या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, तलाठी कार्यालयात खासगी व्यक्ती कशा काय कार्यरत असतात, हा सवालही उपस्थित होत आहे. अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराविरोधात कडक कारवाई होणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. लाच घेताना रंगेहात पकडल्या गेलेल्या तलाठीवर आणि त्यांच्या सहकाऱ्यावर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.