Claim that Muslims have not progressed in 70 years : ७० वर्षांत मुस्लीमांची प्रगती झाली नसल्याचा दावा
Amravati गेल्या ७० वर्षांत एकाही राजकीय पक्षाने मुस्लिम समाजाची खरी प्रगती केली नाही, तसेच अल्पसंख्याक समाजाचा सक्षम नेता तयार होऊ दिला नाही. त्यामुळे मी स्वतःला नेता मानत नाही, तर समाजातून नवे नेते घडवण्यासाठी आलो आहे, अशी स्पष्टोक्ती एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी केली.
अमरावती-वळगाव मार्गावरील अकॅडमिक स्कूलच्या प्रांगणात एमआयएम उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. खासदार ओवैसी म्हणाले की, मागील सात दशकांत अल्पसंख्याक समाजाचा आवाज बुलंद करणारा एकही खंबीर नेता उभा राहू शकला नाही. मात्र, निवडणुकांच्या माध्यमातून मुस्लिम समाजात नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न एमआयएम करत आहे. अमरावती महापालिका निवडणुकीतून जे नेते पुढे येतील, ते समाजाचा आवाज ठामपणे मांडतील आणि अन्याय-अत्याचाराविरुद्ध संघर्ष करून मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रातील भाजप सरकार मुस्लिम समाजावर अन्याय आणि अत्याचार करत असल्याचा आरोप करत ओवैसी म्हणाले की, आजही सर्वसामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळत नाहीत. पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही, भूमिगत गटारे नाहीत, गरीबांच्या उपचारासाठी दर्जेदार रुग्णालये उपलब्ध नाहीत, तसेच शिक्षणासाठी चांगल्या शाळांचाही अभाव आहे. विकासासाठी सरकारकडून निधी येतो; मात्र त्याचा योग्य वापर होत नाही, असा आरोप त्यांनी केला.
Akola Municipal Corporation : अकोल्यात भाजप-शिंदेसेना युती का फिसकटली?
राजकीय पक्ष आघाड्या करून जनतेची दिशाभूल करत असून दिलेले शब्द पाळले जात नाहीत. त्यामुळे जनतेचा उपहास होत असल्याची टीकाही खासदार ओवैसी यांनी यावेळी केली.
यावेळी एमआयएमचे शहराध्यक्ष हाजी इरफान खान, युसूफ पूजांजी, अब्दुल हमीद यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








