Breaking

Ashish Jaiswal : रामटेकला मंत्री मिळाले; आता विकासाची प्रतिक्षा !

Ramtek awaits development : २३ विकासकामांचे नियोजन, पण नियमांचा ठरतोय अडसर

भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या रामटेकचा विकास पाहिजे तसा झाला नाही. लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये रामटेक चर्चेत असतं. पण त्यानंतर विसर पडतो. चार दशकांनंतर रामटेकच्या वाट्याला मंत्रीपद आलं, पण अद्याप विकासामधील अडसर दूर व्हायचे नाव घेत नाही. मात्र, आता राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्या निमित्ताने हा अडसर दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले रामटेक हे प्राचीन शहर आहे. या भागात वाकाटकांचे वास्तव्य होते. वाकाटकांची राजधानी असलेले नंदिवर्धन अर्थात नगरधन रामटेकमध्येच आहे. पण ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या रामटेककडे सरकारने मात्र कायम दुर्लक्षच केले आहे. राज्य शासनाने ४९.२८ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली. २३ प्रकारची कामे हाती घेण्यात आली. ३५ कोटींचा निधी प्राप्त झाल्यानंतर कामाने वेगही घेतला होता. मात्र यातील अनेक कामे वनविभाग आणि पुरातत्व खात्याच्या नियमांतच बसत नाहीत. त्यामुळे ही कामे रखडली आहेत. प्रशासनाकडून याचा आता पाठपुरावा सुरू आहे.

रामटेकला महाराष्ट्र शासनाने २१ मे २०१८ रोजी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात मंजुरी दिली. पार्किंगजवळ आणि नृसिंह मंदिराजवळ स्वच्छता गृह तयार करण्यात आले. यात्री निवासचे आणि अंबाळा तलाव, डिअर पार्क, योग भवन ही कामे पूर्ण झाली असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

त्रिविक्रम मंदिराकडे जाणारी पायवाट, कर्पूरबावडीकडे जाणारी पायवाट, रामटेक शहरात प्रवेश करण्यासाठीच्या सहा भव्य प्रवेशद्वाराचे काम मात्र रखडले आहे. या कामांना सुरुवात झाली होती, मात्र वनविभाग आणि पुरातत्व खात्याच्या नियमांत बसत नसल्याने ही कामे होऊ शकली नाही, असे पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पहिल्याचा पत्ता नाही, दुसऱ्या आराखड्याला मान्यता
दुसऱ्या टप्प्यातील आराखड्यालाही मान्यता देण्यात आली आहे. यात २११ कोटी रूपयांना अर्थसंकल्पात मंजुरी दिली. रामटेक शहराचे सौंदर्याकरण, गडमंदीर येथे आकर्षक विद्युत व्यवस्था, दुकानगाळे, अंबाळा येथे दुकानगाळे, विद्युत व्यवस्था, नारायण टेकडीचा विकास, कालिदास स्मारकाचा विकास, राखी तलाव विकास, रामटेक शहराला सुंदर बनविण्यासाठी रामटेकचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी रामटेकच्या विकासाचे नियोजन आखण्यात आले.