Ashish Shelar said on Suresh Dhas – Dhananjay Munde meeting : महापालिका निवडणुकीत एकला चलोबाबत चाचपणी सुरू असल्याचा इन्कार
Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या सातत्याने आरोप करणारे भाजप नेते सुरेश धस यांनी मुंडेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. हा विषय सध्या जोरात चर्चिला जात आहे. पण यासंदर्भात मला पूर्ण माहिती नाही. मी वर्तमानपत्रातून बातम्या वाचल्या आहे. त्या दोघांची भेट झाली की नाही, याची मला माहिती नाही असे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले.
नागपुरात आज (१५ फेब्रुवारी) आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, फिल्म सिटीसाठी रामटेकजवळ १२८ एक जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी अनेक विभागाची संयुक्त बैठकही झाली आहे. विदर्भात चित्रपट निर्मितीला चालना मिळावी, यासाठी चित्रपट नगरी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. 128 एकर जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आगामी पंधरा दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल. नागपूर जिल्ह्यातील फिल्मसिटी यशस्वी व्हावी, यासाठी एक कन्सल्टंट नेमण्याचा निर्णय झाला आहे.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बाबतीत आरबीआय ने नियम आणि कायद्याच्या चौकटीत कारवाई केली आहे. या दृष्टीने लोकांचे पैसे सुरक्षित राहावे, यासाठीच ही कारवाई केली आहे. केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री चर्चा करून सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहतील, असे प्रयत्न करत आहेत. लोकांना पैसे परत मिळतील याची काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले.
रणवीर अलाहाबादियाबाबत विचारले असता, रणवीर अलाहाबदिया प्रकरणी आधीच चौकशी सुरू आहे. अश्लील संवाद असलेले कांदेपोहे नावाचे कार्यक्रम आधीच सुरू आहे. असे कार्यक्रम होत असताना रंगभूमी मंडळाची त्याला परवानगी नसेल, तर त्याबद्दल चौकशी करून कारवाई करा, असे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंसारखा विकासासाठी Passionate नेता बघितला नाही!
लव जिहाद कायदा समिती समितीबद्दल माहिती नाही. माहिती घेऊन त्यावर बोलेन. मुंबई महापालिका निवडणुकीत युती बाबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मिळून निर्णय करतील. मात्र सर्वसाधारणपणे महायुती एकत्रित निवडणुकीला सामोरे जाईल, असे चित्र आहे, असे मंत्री शेलार यांनी सांगितले.
‘हलक्यात घेऊ नका’, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. याबाबतच्या चर्चांना अर्थ नाही. महायुती म्हणून आम्ही एकत्रित आहोत. एकत्रित सरकारमध्ये आलेलो आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही एकत्रित लढवण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे म्हणाले ते विरोधकांना म्हणाले असतील. मातोश्रीने त्यांना आजवर हलक्यात घेतलं म्हणून त्यांची अशी परिस्थिती झाली. अजूनही हलक्यात घेत आहेत. त्यामुळे मातोश्रीकडे त्यांचा इशारा असेल, असे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीत एकला चलो बाबत चाचपणी सुरू असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.