ashok-kharat-case-nashik-crime-news-kasturi-herbs-fake-gems-police-investigation-update : अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; पोलिसांचा तपास वेगात
Mumbai : नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलीस तपासाला नवे वळण मिळाले असून या प्रकरणातील आर्थिक आणि अंधश्रद्धेशी संबंधित व्यवहारांचा गुंता अधिकच वाढताना दिसत आहे. ताज्या माहितीनुसार, या प्रकरणात एका मोठ्या आयुर्वेदिक औषधे आणि जडीबुटी विक्रेत्याची चौकशी होणार असून खरातने या दुकानातून हरिणाची कस्तुरी तसेच विविध जडीबुटी खरेदी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याचबरोबर नाशिकरोड परिसरातील एका ज्वेलर्सलाही पोलिसांनी रडारवर घेतले आहे. या ज्वेलर्सकडून बनावट रत्नांची खरेदी करण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यासाठी या वस्तूंचा वापर केला गेला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधी यांचा परस्पर संबंध उलगडण्यावर तपास यंत्रणांचा भर आहे.
Rupali chakankar : पक्षाची बदनामी टाळण्यासाठी महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही राजीनाम्याची मागणी
दरम्यान, अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेतल्याच्या आरोपाखाली अशोक खरात याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष तपास पथकाकडून त्याची कसून चौकशी सुरू असून दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आतापर्यंत त्याच्याविरोधात दहा गुन्हे दाखल झाले असून प्रकरण अधिक गंभीर होत चालले आहे.
तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब उघड झाली असून खरातकडे असलेला शस्त्र परवाना नाशिक जिल्हा प्रशासनाने दिल्याची माहिती समोर आली आहे. 2012 साली हा परवाना मंजूर झाला होता आणि 2024 मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. खरातच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली असून त्यापैकी काही वापरलेली असल्याचे आढळले आहे. या काडतुसांचा वापर नेमका कशासाठी करण्यात आला याचा तपास सुरू आहे. दरम्यान, शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
Uddhav thackeray : उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदींचा संताप
याशिवाय, अशोक खरातच्या शिवानिका संस्थांचे बँक खाते सील करण्यात आले असून त्याच्या मालमत्तेचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर आणि इतर मालमत्तांची माहिती गोळा केली जात आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेची पडताळणी सुरू असून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचा तपास केला जात आहे. या मालमत्तेसाठी वापरलेला निधी नेमका कुठून आला याचा शोध घेण्यावर तपास यंत्रणांचा भर आहे. अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे होत असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








