ashok-kharat-case-trupti-desai-rupali-chakankar-allegations-political-row : देसाईंचा इन्कार तर रुपाली चाकणकर प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र
Mumbai : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सुरू असलेल्या तपासादरम्यान आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणात लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे आधीच खळबळ उडालेली असताना आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी या प्रकरणाला नवे वळण दिले आहे.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी तृप्ती देसाईंवर गंभीर आरोप करत दावा केला आहे की, अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाचे व्हिडिओ पुरावे देसाई यांच्या ताब्यात आधीपासून होते. मात्र हे पुरावे सार्वजनिक न करता त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांची तडजोड केली. या कथित व्यवहारामागे संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
या आरोपांना तृप्ती देसाई यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत त्यांना निराधार आणि बदनामीकारक ठरवले आहे. काही जण प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे आरोप करत असल्याचे सांगत त्यांनी आपण नेहमी महिलांच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम केले असल्याचा दावा केला. लोकांचा विश्वास असल्यामुळेच संवेदनशील माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचली आणि ती त्यांनी पुढे राज्याच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचवली, असेही त्यांनी नमूद केले. रुपाली चाकणकर यांच्यासोबत कोणतीही तडजोड झाल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचे सांगत या प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई व्हावी यासाठी आपण पुढेही प्रयत्न करणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
Crime news : प्रेमविवाहाचा राग, तरुणाची नग्न करून गावभर धिंड, लोखंडी रॉडने बेदम मारहाण
दरम्यान, अशोक खरात प्रकरणामुळे आधीच अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या आणि अशोक खरात यांच्यातील कथित संबंधांमुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठीच राजीनामा आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. महिलांवरील अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Ashok kharat case : नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीची ७ तास चौकशी
याच प्रकरणाशी संबंधित आणखी एका वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या जखमेच्या फोटोवरूनही राजकीय आरोप झाले. काही नेत्यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर पक्षाच्या नेत्यांकडून त्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. या सर्व घडामोडींमुळे अशोक खरात प्रकरण केवळ गुन्हेगारी तपासापुरते मर्यादित न राहता आता मोठ्या राजकीय संघर्षाचे रूप घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील काळात या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
___








