Ashok kharat case : नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीची ७ तास चौकशी

nashik-ashok-kharat-sit-investigation-7-hours-rupali-chakankar-resignation-news : नीरज जाधवसोबत समोरासमोर खडाजंगी, पोलीस कोठडीत रवानगी राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिक येथे महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधातील तपासाला वेग आला असून विशेष तपास पथकाकडून त्याची तब्बल सात तास सखोल चौकशी करण्यात आली. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. या चौकशीदरम्यान तांत्रिक पुरावे, आर्थिक व्यवहार, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे तसेच राजकीय आणि व्यावसायिक संबंध यांचा बारकाईने तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अशोक खरात याला पुन्हा पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.

या तपासात एक महत्त्वाची घडामोड म्हणजे अशोक खरात आणि त्याच्या कार्यालयातील कर्मचारी नीरज जाधव यांची प्रथमच समोरासमोर चौकशी करण्यात आली. या वेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महिला अत्याचार आणि बलात्काराच्या आरोपांशी संबंधित तपशील उघड करण्यासाठी ही सामोरा समोर चौकशी निर्णायक मानली जात आहे. तपास यंत्रणा खरातचे विविध राजकीय संबंध आणि त्याच्या आर्थिक नेटवर्कचा मागोवा घेत आहे.

Epstein files : मोदींचे नाव ‘एपस्टीन फाईल्स’मध्ये? काँग्रेस-वंचित थेट संघ मुख्यालयावर धडकणार

दरम्यान, या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नेत्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अशोक खरातसोबतचे त्यांचे काही फोटो सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. तसेच त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी विरोधी पक्षातील काही महिला नेत्यांकडून करण्यात येत आहे. खरातच्या संस्थेशी संबंधित पदावरही त्यांची नियुक्ती झाल्याची माहिती समोर आल्याने वाद अधिकच तीव्र झाला होता.

तपासाच्या अनुषंगाने आणखी एक महत्त्वाचा धागा पुढे आला असून दीपक लोंढे यांचीही विशेष तपास पथकाने चौकशी केली आहे. लोंढे आणि अशोक खरात यांच्यात काही व्यावसायिक संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात असून सिन्नर परिसरातील जमीन व्यवहारांशी संबंधित तपास सुरू आहे.

Ramdas Athavale: दलित समाजात उपवर्गीकरणावरून मतभेद; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मात्र समर्थन

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या प्रकरणात खळबळजनक दावा करत अशोक खरात याच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. मोठ्या राजकीय व्यक्तींशी असलेले संबंध उघड होऊ नयेत म्हणून त्याचा एन्काऊंटर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. न्यायालयाने अशोक खरात याला निश्चित कालावधीसाठी पोलीस कोठडी सुनावली असून पुढील सुनावणीवेळी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.