Breaking

Crime in Nagpur : गुंडासाठी पोलिसांवर हल्ला; साध्या वेषामुळे झाला गैरसमज

Attack on Madhya Pradesh Police in Nagpur : मध्यप्रदेश पोलीस होते कुख्यात गुंडाच्या शोधात

Nagpur मध्यप्रदेशातील जबलपूरमधला एक कुख्यात गुंड नंदनवनमध्ये लपून बसला आहे, हे स्थानिक पोलिसांना कळले नाही. मात्र मध्यप्रदेशातील पोलीस त्याला शोधत आले. त्यांना तो सापडलाही. पण मध्यप्रदेश पोलीस साध्या वेशात होते. त्यामुळे गुंड व त्याच्या पत्नीने आरडाओरड करताच सर्वसामान्य लोकांनी पोलिसांवरच हल्ला केला. एका भल्या माणसाला व त्याच्या बायकोला काही लोक त्रास देत असल्याचा लोकांचा गैरसमज झाला. नंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुंडाला अटक झाली.

जवळपास 20 पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला गँगस्टर अंकित पटेल वेश बदलून नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत होता. साध्या वेषात आलेल्या मध्यप्रदेश पोलिसांनी अंकितला टांगा चौकात घेरले. अटक करताच त्याने आरडाओरड करून नागरिकांना गोळा केले. नागरिकांनी त्याला मदत करण्याच्या अनुषंगाने पोलीस पथकावर हल्ला केला. त्यामुळे पोलीस पथक घाबरले.

Politics in Akola : उमेदवारीसाठी पक्ष सोडला, आता ‘घरवापसी’चा हट्ट!

दरम्यान तहसील पोलिसांचे वाहन तेथून जात असताना हा प्रकार लक्षात आला. तहसील पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांना मदत करत अंकित पटेलला अटक करण्यात सहकार्य केले. मात्र मध्यप्रदेश पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. बड्डू ऊर्फ अंकित पटेल (वय २९, रा. जोशी मोहल्ला), असे गुन्हेगाराचे नाव आहे.

कुख्यात गँगस्टर अंकित पटेलविरुद्ध दरोडा, लूट, बलात्कार, खंडणी, मारहाण व शस्त्र प्रतिबंधक कायद्यासह तब्बल एकवीसपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमांतर्गतही (एनएसए) कारवाई करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी जबलपूरमध्ये बड्डूविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच बड्डू हा पसार होत नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला होता.

बड्डू पसार झाल्याने जबलपूर पोलिसांचे विशेष पथक त्याचा शोध घेत होते. बड्डू हा नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहात असल्याची माहिती जबलपूर पोलिसांना मिळाली. शनिवारी रात्री जबलपूर पोलिसांचे पथक नागपुरात दाखल झाले. रात्री ९ वाजताच्या सुमारास बड्डू तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्नी व मुलासह टांगा स्टॅण्ड चौकात फिरत होता. याची माहिती जबलपूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार जबलपूर पोलिसांचे पथक साध्या वेषात तेथे पोहोचले. बड्डू दिसताच पोलिसांनी त्याला पकडले. यादरम्यान बड्डूने आरडा-ओरड केल्याने काही गुंड प्रवृत्तीचे युवक त्याचे अपहरण करीत असल्याचा समज नागरिकांना झाला.

MLA Sulbha Khodke : प्रवाहाविरुद्ध कार्य करणे हीच परिवर्तनाची नांदी

अंकित पटेलच्या बायकोने पोलिसांशी वाद घातला. पतीला अटक करण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. तिने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला चावा घेऊन शिवीगाळ केली. गैरसमजातून नागरिकांनी बड्डूला सोडविण्यासाठी पोलीस पथकावर हल्ला केला. आम्ही मध्य प्रदेश पोलीस आहोत आणि हा आरोपी आहे त्याला अटक करीत आहोत असे ते नागरिकांना सांगत होते परंतु, नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान या घटनेने टांगा स्टॅण्ड परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. यादरम्यान तहसील पोलिसांचे पथक तिथून जात असताना त्यांना हा प्रकार दिसला.

त्यांनी लगेच मध्य प्रदेश पोलिसांची मदत केली तहसील पोलिसांच्या मदतीने अंकित पटेलला ताब्यात घेऊन तहसील पोलीस ठाण्यात आणले. तेथे अंकित पटेल याला मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. मध्य प्रदेश पोलिस बड्डूला घेऊन जबलपूरकडे रवाना झाले.