Attempt to escape hiding failed, activists made sit in front of bacchu kadu : लपत सुटण्याचा प्रयत्न फसला, कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंपुढे बसवलं
Nagpur : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनादरम्यान एक नाट्यमय प्रसंग घडला. नागपूर-हैदराबाद महामार्गावर सुरू असलेल्या या आंदोलनात वर्धा जिल्ह्याच्या देवरी मतदारसंघाचे आमदार राजू बकाने हे आपल्या वाहनासह अडकले. परिस्थिती चिघळल्याने त्यांनी वाहन तेथेच सोडून सुरक्षारक्षकांच्या घेऱ्यातून लपत सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रहारचे कार्यकर्ते सजग होते आणि त्यांनी आमदार बकाने यांना ओळखून थेट बच्चू कडूंपुढे आणून बसवलं.
शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते हैदराबाद आणि समृद्धी महामार्ग बंद करून चक्काजाम आंदोलन करत असताना हा प्रकार घडला. या आंदोलनात भंडाऱ्याचे प्रहार जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचवेळी, आमदार राजू बकाने यांची गाडी या बंद रस्त्यावर अडकली. गाडी अडकल्याचे लक्षात येताच आमदारांनी लपत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्त्यांनी त्यांना अलगद पकडून आंदोलनस्थळी बच्चू कडूंसमोर बसवलं.
Local body election : निवडणुकीसाठी फक्त उत्साह नाही, ‘दारूगोळा’ही दाखवा
प्राप्त माहितीनुसार, चार तासांहून अधिक वेळ आमदार बकाने हे बच्चू कडू आणि प्रहार कार्यकर्त्यांच्या गराड्यात बसलेले होते. या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि “शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, येत्या अधिवेशनात हा मुद्दा मी स्वतः मांडेन,” असं आश्वासन दिलं.
दरम्यान, बच्चू कडूं, रविकांत तुपक तसेच विविध शेतकरी नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू केले आहे. यात हजारो शेतकरी आणि शेकडो ट्रॅक्टर सहभागी झाले असून, समृद्धी महामार्गासह जबलपूर, भंडारा आणि हैदराबादकडे जाणारे प्रमुख मार्ग रोखून धरले आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, सोयाबीन आणि कापूस पिकांना योग्य भाव, शेतकऱ्यांसाठी तातडीने ठोस निर्णय आदींचा समावेश आहे
बच्चू कडू यांनी आंदोलनकर्त्यांना उद्देशून सांगितले की, “जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही.” त्यांनी सरकारला आज दुपारी १२ वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला असून, तोपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास ‘रेल्वे रोको’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, कालची रात्र बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी जामठा येथे महामार्गावरच घालवली. आजही आंदोलन सुरूच असून, गर्दी काहीशी कमी झाली असली तरी महामार्ग अजूनही ठप्प आहे. आता सरकार या आंदोलनावर कोणतं पाऊल उचलतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








